Aditi Tatkare : आव्हाडांचा दावा हास्यास्पद ; अदिती तटकरे यांची टीका  | पुढारी

Aditi Tatkare : आव्हाडांचा दावा हास्यास्पद ; अदिती तटकरे यांची टीका 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सुनील तटकरे यांचे ऐकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेतल्याचा आ. जितेंद्र आव्हाड दावा हास्यास्पद असल्याची टिका महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी केली. उंटवाडी येथील बाल व निरीक्षणगृहाच्या विस्तारित वास्तूच्या उद्घाटनासाठी तटकरे गुरुवारी शहरात आल्या होत्या. त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सुनील तटकरे यांचे ऐकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेतल्याचा दावा आ. जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना अदिती तटकरे यांनी सांगितले की, आव्हाड यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे. उपमुख्यमंत्री पवार हे ४० वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून, ते दुसऱ्यांचे ऐकून निर्णय घेत नाहीत. आव्हाड यांनी अनेकवेळा त्यांची भूमिका बदलली आहे. आपल्या बोलण्याने जनतेच्या भावना दुखावणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यातील अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाविषयी तटकरे म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांच्या अनेक मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. तीन हजार अंगणवाडी सेविकांचे प्रश्न मार्गी लावले. त्यांच्या मानधनाची मागणी गेल्या पाच वर्षांपासून आहे. त्यांना २० टक्के मानधन लागू झाले आहे. त्यांना पेन्शनही मिळावी, ही राज्य सरकारची भूमिका आहे. पण, त्यासाठी थोडा वेळ लागेल. मागण्यांविषयी सरकार सकारात्मक असून, अंगणवाडी सेविकांनी कामबंद करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा

Back to top button