पावसाच्या पाण्याने होर्डिंगमधून उमटतात ‘मेघ मल्हार’चे सूर!

पावसाच्या पाण्याने होर्डिंगमधून उमटतात ‘मेघ मल्हार’चे सूर!

हैदराबाद : आपल्याकडे सोळा कला प्रसिद्ध आहेत. आधुनिक काळात जाहिरातीला 'सतरावी कला' म्हटले जात आहे. अनेक लोक अत्यंत कल्पकतेने जाहिरात करीत असतात. त्यासाठी शहरात होर्डिंग्ज, बिलबोर्ड लावले जातात. मात्र, त्यामध्येही 'हट के' असे काही तरी करणारे अनेकजण आहेत. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे तर एक असे बिलबोर्ड आहे जे चक्क संगीत निर्माण करते. पावसाचे पाणी या बिलबोर्डवर पडले की, त्यामधून मेघ मल्हार रागाचे सूर उमटू लागतात!

एका चहा कंपनीने विजयवाडामध्ये हे भले मोठे व अत्यंत कल्पक असे होर्डिंग लावले आहे. या होर्डिंगवर मोठे लाकडी चमचे आहेत. ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी या चमच्यांमध्ये पाणी भरते. पाण्याच्या वजनामुळे चमचे वाकून सर्किट बोर्डवर आदळतात व त्यामुळे 'मेघ मल्हार'चे मधुर सूर उमटू लागतात. राग मेघ मल्हार हा वर्षाऋतुशी संबंधित आहे, याची अनेकांना कल्पना असेलच.

रस्त्यावरून जाणारे अनेक लोक या मधुर ध्वनीकडे आकर्षित होतात व साहजिकच या जाहिरातीकडेही लोकांचे लक्ष जाते. या थक्क करणार्‍या व पर्यावरणपूरक प्रयत्नाची दखल 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्'नेही घेतली आहे. या म्युझिकल बिलबोर्डला गिनिज बुकने 'जगातील सर्वोत्कृष्ट इको-फ्रेंडली होर्डिंग' घोषित केले आहे. या बिलबोर्डला 'मेघसंतुर' असे नाव देण्यात आले आहे. त्यामधून संतुरसारखा ध्वनी निघतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news