साहित्यविश्वाला अण्णा भाऊ समजले नाहीत : विश्वास पाटील यांची खंत | पुढारी

साहित्यविश्वाला अण्णा भाऊ समजले नाहीत : विश्वास पाटील यांची खंत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकशाहीर अण्णा भाऊ यांचे साहित्य हे अनुभवातून आलेले साहित्य होते. महाराष्ट्राच्या रानवाटा तुडवत त्यांच्या गाठीशी जो अनुभवसंचय झाला, जी विषमता त्यांनी समाजा-समाजात पाहिली त्या वेदनेतून अण्णा भाऊ साठे यांचे अस्सल साहित्य जन्माला आले. परंतु, महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात आणि साहित्यवर्तुळात ते दुर्लक्षित राहिले. मराठी साहित्यविश्वाला त्यांच्या साहित्याचा आवाका समजला नाही. एवढे विपुल, विस्तृत आणि काळजाला हात घालणारे लेखन करूनही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाचा विचार किंवा चर्चा देखील केली गेली नाही, अशी खंत ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेतर्फे आयोजित पहिल्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य कला संमेलनाच्या उद्घाटनावेळी संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून पाटील बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, निबंधक इंदिरा अस्वार, साहित्यिक मिलिंद कसबे, समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. दिनेश डोके, भगवान वैराट, मच्छिंद्र सट्टे, सत्येंद्रनाथ चव्हाण आदी उपस्थित होते. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या संमेलनस्थळाचे नामकरण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले साहित्यनगरी असे करण्यात आले. यानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सव आणि चित्रप्रदर्शनाचे उद्घाटनही झाले.

तसेच ग्रंथदिंडी काढण्यात आली. या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान करण्यात आला.
पाटील म्हणाले की, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे मातीतले साहित्यिक होते आणि ‘फकिरा’ हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. विदर्भ-मराठवाड्यात त्यांचा जेवढा उत्सव साजरा केला जातो, तेवढा उत्सव पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित महाराष्ट्रात झाला नाही, हे खेदजनक आहे.

हेही वाचा

Back to top button