कर्करोग जनजागृती : नियमित तपासणीतून सर्व्हीकल कॅन्सरला प्रतिबंध | पुढारी

कर्करोग जनजागृती : नियमित तपासणीतून सर्व्हीकल कॅन्सरला प्रतिबंध

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगानंतर सर्वाधिक प्रमाणात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे, अर्थात सर्व्हीकल कॅन्सरचे प्रमाण पाहायला मिळत आहे. गर्भाशयाच्या मुखातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कर्करोगाचा धोका उद्भवतो. त्यामुळे नियमित आरोग्यतपासणी, वेळेवर निदान आणि उपचार, ही त्रिसूत्री महत्त्वाची असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

दर वर्षी जानेवारी महिना ‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग जनजागृती महिना’ म्हणून साजरा केला जातो. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो. कमी वयात कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी एचपीव्हीची लस घेण्याबाबतीत जनजागृती होणे आवश्यक आहे, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भारती पाटील यांनी सांगितले.

असुरक्षित लैंगिक संबंध, एकाधिक लैंगिक भागीदार, लैंगिक संक्रमणातून होणारे आजार, गर्भनिरोधक गोळ्यांचा दीर्घकालीन वापर, धूम्रपान ही सर्व्हायकल कॅन्सरची प्रमुख कारणे आहेत. सध्या तपासणीसाठी लागणारा सर्व्हीकल स्वॅब डॉक्टर किंवा नर्स संकलित करतात. अनेक महिलांना, विशेषत: ग्रामीण भागातील स्त्रियांना याबाबत संकोच वाटतो. त्यामुळे त्या तपासणी करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये याबाबत जनजागृती होण्याची गरज अधोरेखित होत आहे.

एग फ्रीझिंग चांगला पर्याय

गर्भाशयाच्या कर्करोगामुळे वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. अशा महिलांसाठी एग फ्रीझिंग हा चांगला पर्याय असू शकतो. एग फ्रीझिंग या पध्दतीमध्ये स्त्रीच्या अंडाशयातून अंडी घेतली जातात. फलित नसलेली अंडी भविष्यातील वापरासाठी साठवून ठेवली जातात आणि भविष्यात गर्भधारणा नियोजन केले जाऊ शकते, अशी माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रणिती महाजन यांनी दिली.

होही वाचा

Back to top button