विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव असल्याचा अभिमान : डॉ. सुरेश गोसावी | पुढारी

विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव असल्याचा अभिमान : डॉ. सुरेश गोसावी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणार्‍या आणि स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्य वाहून घेतलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या नावे पुणे विद्यापीठ असल्याचा अभिमान आहे, असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले.
भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका असलेल्या सावित्रीबाई फुले यांची जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, हैद्राबादमधील ईएफएल विद्यापीठाच्या माजी प्र-कुलगुरू प्रा.(डॉ.) माया पंडीत- नारकर, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ.) विजय खरे, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या बागेश्री मंठाळकर आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
डॉ. गोसावी म्हणाले, समाजातील असमानतेमुळे स्त्रियांना शिक्षण घेता येत नसताना सावित्रीबाईंनी असामान्य धैर्य दाखवत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. तसेच नकारात्मक प्रथेवर बंदी घालण्याचे काम करून प्रगतिशील समाजाचा पायाही त्यांची रचला.

प्रा. (डॉ.) माया पंडीत-नारकर म्हणाल्या, सावित्रीबाईंनी त्या वेळी समाजातील महिलांना शिक्षणाद्वारे त्यांच्या मुक्तीची द्वारं कशी उघडता येईल, हे सांगून ज्ञानाच्या ऊर्जेतून येणारा आत्मविश्वास त्यांना मिळवून दिला. सावित्रीबाई स्त्रियांना नुसते शिक्षण देऊन थांबल्या नाहीत, तर त्यांच्यावर होणार्‍या विविध अत्याचाराच्या विरोधातही त्या उभ्या राहिल्या त्यामुळे त्यांना स्त्रीमुक्तीची जननी म्हणणे वावगे ठरणार नाही. प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव यांनी, तर सूत्रसंचालन शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गीता शिंदे यांनी केले.

हेही वाचा

Back to top button