देशात 15 लाख टनांनी वाढणार साखर उत्पादन | पुढारी

देशात 15 लाख टनांनी वाढणार साखर उत्पादन

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  देशात चालू वर्ष 2023-24 मध्ये हंगामाच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार 290 लाख टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा वर्तविण्यात आली. मात्र, केंद्र सरकारने उसाच्या रसापासून तयार होणार्‍या इथेनॉलनिर्मितीवर मर्यादा आणल्यामुळे जवळपास 15 लाख टनाने साखर उत्पादनात वाढ होईल. त्यामुळे देशांतर्गत वापरासाठी एकूण नव्या साखरेची उपलब्धता 305 लाख टनांवर पोहचेल, अशी माहिती नवी दिल्लीतील राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली.

याबाबत प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, साखरेचे वाढीव उत्पादन अपेक्षित असताना तसेच हंगामाच्या सुरुवातीची शिल्लक साखर, अपेक्षित स्थानिक खप लक्षात घेता इथेनॉलनिर्मितीवरील सध्या लादण्यात आलेली बंधने काही प्रमाणात शिथिल होऊ शकतात. त्यादृष्टीने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ आणि इंडियन शुगर मिल्स असोसिएशन संयुक्तपणे केंद्र सरकारकडे याबाबत मागणी करणार असल्याची माहिती महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.

देशात 31 डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 511 कारखान्यांनी 1 हजार 223 लाख टन ऊस गाळप पूर्ण करून 112 लाख टन नवे साखर उत्पादन तयार केले आहे. देशातील सरासरी साखर उतारा 9.17 टक्के मिळाला असून, जसजसे थंडीचे प्रमाण वाढेल त्यानुसार उतार्‍यात वाढ होऊन साखर उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. देशात हंगामाच्या अखेरपर्यंत उत्तर प्रदेशात 115 लाख टन, महाराष्ट्रात 90 लाख टन, कर्नाटकात 42 लाख टन, तामिळनाडूमध्ये 12 लाख टन, गुजरातमध्ये 10 लाख टन व इतर सर्व राज्ये मिळून एकूण 305 लाख टन इतके साखर उत्पादन होण्याची अपेक्षाही नाईकनवरे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

Back to top button