पीएमआरडीएचा भूखंड सार्वजनिक प्रयोजनासाठी राहावा : मेधा पाटकर | पुढारी

पीएमआरडीएचा भूखंड सार्वजनिक प्रयोजनासाठी राहावा : मेधा पाटकर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : निगडी येथील पीएमआरडीएचा पेठ क्रमांक 24 येथील भूखंड कायमस्वरूपी सार्वजनिक उपक्रमासाठी राखीव ठेवावा, यासाठी भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समिती व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती यांचे विविध मार्गाने आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला राष्ट्रीय जनआंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी सोमवारी (दि. 1) पाठिंबा दिला. असंघटित कष्टकरी पेन्शन परिषदेसाठी त्या पिंपरी-चिंचवड येथे आल्या होत्या. त्या प्रसंगी त्यांनी निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानाजवळ असलेल्या पीएमआरडीएच्या संबंधित भूखंडाची पाहणी केली. तसेच, हा भूखंड सार्वजनिक प्रयोजनासाठी ठेवण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.

पाटकर म्हणाल्या, पिंपरी-चिंचवड शहराच्या निगडी येथील प्रवेशद्वाराजवळ असणार्या ऐतिहासिक भक्ती-शक्ती समूह शिल्पालगत ही जागा आहे. या जागेत तिरंगा ध्वज आहे. समोर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा आहे. या जागेवर बांधकाम व्यावसायिकांचा डोळा आहे. केवळ मॉल आणि इमारती म्हणजे विकास नाही. तर, काही भूखंड सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आणि लहान मुलांना खेळण्यासाठी मोकळे राहिले पाहिजे. त्यामुळे या मागणीला मी पाठिंबा देत आहे. सरकारने त्याबाबत सकारात्मक विचार करावा.
भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे मारुती भापकर, सचिन चिखले, प्रसाद बागवे, युवराज गटकर, बी. बी. खंडागळे, ब्रह्मानंद जाधव, युवराज दाखले, सचिन काळभोर, वैभव कुर्हाडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button