सिंहगड पर्यटकांनी ‘हाऊसफुल्ल’; दिवसभरात दीड लाखांचा टोल जमा | पुढारी

सिंहगड पर्यटकांनी ‘हाऊसफुल्ल’; दिवसभरात दीड लाखांचा टोल जमा

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रविवारी सिंहगड, राजगड, तोरणागडासह खडकवासला चौपाटी, पानशेत परिसरात पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. सिंहगडावर वाहनाने जाणार्‍या पर्यटकांकडून वनविभागाने दीड लाख रुपयांचा टोल वसूल केला. सिंहगडावर सकाळपासून राज्यासह देशभरातील पर्यटकांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी घाटरस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभरात गडावर पर्यटकांची 649 चारचाकी व 1640 दुचाकी वाहने आल्याची नोंद झाली. याशिवाय खाजगी प्रवासी व गडावरील विक्रेत्यांच्या वाहनेही मोठ्या प्रमाणात गेली.

संबंधित बातम्या :

सिंहगड वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील, वनरक्षक बळीराम वाईकर,संदीप कोळी, सुरक्षारक्षक नितीन गोळे, खामकर लांघे आदी सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत करण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत धावपळ करत होते. सायंकाळी गडावरील पर्यटक खाली आले. त्यानंतर कोंढापुर फाट्यावरील गेट बंद करून गडाचा मार्ग बंद करण्यात आला. घाटरस्त्यासह गडाच्या पायी मार्गावर वनविभागाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

राजगड किल्ल्यावर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट झाले आहे. गडावर पुरातत्व विभागाचे पहारेकरी बापू साबळे, सुरक्षारक्षक विशाल पिलावरे,आकाश कचरे दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. गडाच्या मार्गावर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पठारे म्हणाले की, राजगड, तोरणा गडावर जाणार्‍या मार्गावर पोलिस जवान, होमगार्ड पोलिस मित्र तैनात केले आहेत. धरण परिसरात तसेच गडावर जाणार्‍या पर्यटकांची तपासणी करण्यात येत आहे.

दारुच्या बाटल्या, गुटखा, सिगारेट जप्त
वनविभाग व राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने सिंहगडावर येणार्‍या वाहनांची तपासणी करून पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या, गुटखा व सिगारेट जप्त करण्यात आला. मद्य वाहतूक करणार्‍या एका वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर मद्य व गुटखा सापडलेल्या पर्यटकांना गडाच्या पायथ्यापासून माघारी पाठविण्यात आले. या मोहिमेत प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे यांच्यासह कार्यकर्ते, वनविभागाचे सुरक्षारक्षक सहभागी झाले होते.

अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी सायंकाळपासून सकाळपर्यंत सिंहगडावर पर्यटकांना मनाई आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सुरक्षारक्षक ठिकठिकाणी पहारा देत आहेत. वाहन तपासणीत मद्य सापडलेल्या एका वाहनांवर कारवाई करण्यात आली, तर मद्य, गुटखा जप्त करून इतरांना माघारी पाठविण्यात आले.

                                                  – समाधान पाटील,वन परिमंडळ अधिकारी

Back to top button