Pimpri : मालमत्ता उतारा आता ऑनलाइन | पुढारी

Pimpri : मालमत्ता उतारा आता ऑनलाइन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून एक जानेवारीपासून असेसमेंट रजिस्टर ऑनलाइन करण्यात आले आहे. यापुढे एक जानेवारीपासून होणार्‍या सर्व नोंदी फक्त ऑनलाइन होतील. तसेच, मिळकतकर उतारा ऑनलाइन काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर संकलन विभागाने या माध्यमातून मालमत्ताधारकांना नवीन वर्षानिमित्त ‘डबल गिफ्ट’ दिले आहे.
शहरातील 6 लाख 15 हजार मिळकतींची नोंद महापालिकेकडे आहे. नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी मालमत्ताकर उतारा लागतो. हा उतारा काढण्यासाठी यापूर्वी नागरिकांना प्रत्यक्ष कर संकलन कार्यालयात जावे लागायचे. त्यानंतर मालमत्ता आकारणी पुस्तकात उतारे शोधावे लागत होते. उतारा हस्तलिखित स्वरूपात दिला जात होता. यासाठी बराच वेळ जात असे.

आता 1 जानेवारीपासून सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. एक जानेवारीनंतर ऑनलाइन नोंदणी केल्यास तत्काळ उतारा मिळणार आहे. यासाठी 20 रूपये शुल्क असणार आहे. 31 डिसेंबर 2023 पूर्वीच्या नोंदी नोंद वहीमध्ये असल्यामुळे संबंधित मालमत्ताधारकांना मालमत्ता उतारा या टॅबवर क्लिक केले की त्याचा तपशील संबंधित झोन कार्यालयाकडे वर्ग केला जाईल. त्यानंतर संबंधित गट लिपिक असेसमेंट रजिस्टरमधील त्या मालमत्तेच्या नोंदी कॉम्प्युटरमध्ये फिड करतील. त्यानंतर संबंधित मालमत्ताधारकांच्या ई-मेल आणि मोबाईलवर लिंक पाठविण्यात येईल. या लिंकवर क्लिक केले की दाखला मिळेल. किंवा महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन दाखला मिळेल. त्यामुळे 1 जानेवारीपासून ऑफलाइन सुविधा बंद करण्यात येणार आहे.

मिळकतकर उतारा मिळवण्याची अशी असेल प्रक्रिया

महापालिकेच्या ुुु.लिालळपवळर. र्सेीं.ळप या संकेतस्थळावर जाऊन कर संकलन विभागाचा पर्याय निवडावा. यामध्ये मोबाईल क्रमांक किंवा मालमत्ता क्रमांक टाकला की त्यामध्ये वेगवेगळे पर्याय दिसतील. मालमत्ताकर उतारा हा पर्याय निवडावा. त्यानंतर फक्त क्लिक करा. मालमत्ताकर उतारा मिळवा. ही प्रक्रिया ओटीपी आधारित असल्याने नागरिकांना त्यांच्या मालमत्तेला आपला मोबाईल क्रमांक लिंक करावा लागणार आहे. आतापर्यंत जवळपास साडेचार लाख मालमत्तांना मोबाईल क्रमांक लिंक केलेले आहेत. उर्वरित मालमत्ताधारकांनीही आपले मोबाईल क्रमांक आपल्या मालमत्तेला लिंक करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

ऑनलाइन सुविधांमुळे हेलपाटे झाले कमी

कर संकलन विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी मालमत्ताधारकांना घर बसल्या ऑनलाईन सुविधा कशा प्रकारे उपलब्ध होतील, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे सुरुवातीला मालमत्ताधारकांचे मोबाईल क्रमांक लिंक करण्यात आले. आतापर्यंत तब्बल साडेचार लाख मालमत्ताधारकांचे मोबाईल क्रमांक लिंक करण्यात आले आहेत. त्यानंतर ना हरकत दाखला, मालमत्ता हस्तांतरण, विविध कर सवलत योजना प्रक्रिया ऑनलाइन सुविधा, कर संवाद, तू करदाता तू करविता यातून कुठल्याही प्रक्रियेची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा नागरिकांना मोठा फायदा होत आहे. नागरिकांचे कार्यालयात हेलपाटे मारणे जवळपास बंद झाले आहे.

खरेदी दस्त नोंदणीनंतर आपोआप नावात बदल

महापालिकेच्या कर संकलन विभाग व दुय्यम निबंधक कार्यालये यांच्या डेटाबेसचे इंटेग्रेशन या महिन्यात करण्यात येत आहे. त्यामुळे खरेदीखत, बक्षीसपत्र, इच्छापत्र याद्वारे मालमत्तांचे होणारे हस्तांतरण करण्यासाठी मालमत्ताधारकांना आता अर्ज करण्याची गरजही राहणार नाही. मालमत्तेच्या नावात तत्काळ बदल होणार आहे. वर्षभरात जुन्या सर्व अभिलेख जसे की, असेसमेंट रजिस्टर, मालमत्तेची मूळ फाईल्स या सर्वांचे स्कॅनिंग आणि डीजिटायझेशन केले जाणार आहे. हे सर्व अभिलेख संबंधित मालमत्तेला जोडले जातील. त्यामुळे संबंधित मालमत्ताधारकाला त्याचे सर्व अभिलेख घर बसल्या एका क्लिकवर उपलब्ध होतील. या प्रकाराची अंमलबजावणी करणारी पिंपरी-चिंचवड महाालिका ही देशातील पहिली महापालिका असेल, असा दावा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केला आहे.

बांधकाम परवानगी मिळताच कर आकारणी लागू होणार

शहरात सध्या ‘महापालिका आपल्या दारी’ अंतर्गत सर्वंकष मालमत्ता नोंदणी अभियान चालू आहे. मालमत्तांना लक्षात राहणारे सोपे व क्रमनिहाय मालमत्ता क्रमांक देणे, घरभेटी देऊन नोंदीसाठी आवश्यक अंतर्गत मोजणी करणे, मालमत्तेचे आराखडे जागीच उपलब्ध करून देणे अशी कामे करण्यात येत आहेत. या सगळ्यामुळे कर संकलन कामकाजात सुसूत्रता व सुलभता येणार आहे. सध्या मालमत्ताकर विभाग व पाणीपट्टी यांचे इंटेग्रेशन निविदास्तरावर आहे. त्यामुळे नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी वेगवेगळी भरण्याचा त्रास वाचणार आहे. महापालिकेचा बांधकाम परवाना विभाग व मालमत्ताकर विभाग यांचे पण इंटेग्रेशन अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला की लगेचच कर आकारणी होणार आहे. त्यासाठी नागरिकांना आता वेगळे अर्ज करण्याची गरज राहणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.

कर संकलन विभाग होतोय हायटेक

आयुक्त शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन विभाग हायटेक करण्याचे काम वेगाने चालू आहे. विभाग आधुनिक करत असताना त्याचा अंतिम फायदा मालमत्ताधारकांना होणे. त्यांची कामे सुलभ व जलदगतीने होणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. कोणत्याही उपक्रमाचा केंद्रबिंदू हा शहरातील नागरिक राहील, याची दक्षता घेत आहोत, असे कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

 हेही वाचा 

Back to top button