रहस्यरंजन : पाण्यातील भयंकर राक्षसी जीव | पुढारी

रहस्यरंजन : पाण्यातील भयंकर राक्षसी जीव

ऋतुपर्ण

सागराच्या पोटात असंख्य रहस्ये दडलेली आहेत, याचे दाखले अनेक कथांमधून मिळतात. जगभरात अनेक राक्षसी आकाराचे जलचर लोकांना दिसलेले आहेत. भारतातही काहीवेळा असे महाप्रचंड आकाराचे राक्षसी मासे दिसून आल्याचे मच्छीमारांनी सांगितलेलं आहे. पुराण कथांमध्ये राक्षसी जलचरांचे वर्णन आढळते.

नदी, तलाव, सागर, महासागर अशा जलाशयांशी संबंधित विविध धर्मांमध्ये, संस्कृतींमध्ये आणि पुराणकथांमध्ये अनेक दंतकथा आणि आख्यायिका आहेत. जगातील सर्व देशांमध्ये त्या सांगितल्या जातात. आपल्याकडे जसा कालिया नावाचा दैत्य नागाच्या रूपात डोहामध्ये राहत होता आणि श्रीकृष्णाने त्याचे पारिपत्य केले, ही कथा आहे, तशा अनेक कथा जगभर आहेत. काही ठिकाणी हे दैत्य घोडा आणि साप यांच्या संमिश्र रूपात असल्याचं सांगितलेलं आहे. त्या प्राण्याला ‘अश्वदैत्य’ असं म्हटलं जातं.

पौराणिक कथांमधल्या दैत्यांशिवाय काही सागरी महाकाय प्राण्यांनाही दैत्य असं लोक म्हणतात. बाराव्या शतकात आयर्लंडमध्ये एका तलावात जलराक्षस राहत होता. तो केवळ खाण्यासाठीच पाण्याबाहेर येत असे. आजूबाजूच्या परिसरातील लोक आणि प्राणी हा त्याचा आहार होता. त्यानं असंख्य प्राणी आणि माणसे खाल्ली. त्याच्याविषयी एकविसाव्या शतकापर्यंतही कथा सांगितल्या जातात. एकेकाळी नष्ट झालेला प्लीसियोसोर हा सागरी राक्षस 1938 मध्ये लोकांना दिसला होता. हा सागरी दैत्य 27 कोटी वर्षांपूर्वी नष्ट झाला होता. असं असूनही आयर्लंडमधील लोक आजही प्लीसियोसोर अस्तित्वात आहे, असं मानतात.

डिलिस फिशर नावाच्या एका शिक्षिकेनं लॉक नेस जलाशयात 1982 मध्ये एक जलराक्षस पाहिला. हा जलाशय स्कॉटलंडमध्ये आहे. तो नेस नदीला जोडलेला आहे. ती लिहिते, तलावाच्या काठाजवळून एक प्रचंड आकाराचा प्राणी वेगानं पोहत होता. नंतर एका क्षणात मला दोन आकार दिसले. त्यातला एक भाग मोठ्या शेपटासारखा होता. मात्र, तो अचानक पाण्यात गडप झाला. त्याचा आकार एखाद्या आडव्या डोंगरासारखा होता. त्याचं दर्शन अगदी छातीत धडकी भरवणारं होतं.

या घटनेनंतर चार वर्षांनी लॉक नेस हॉटेलमध्ये काम करणार्‍या तीन तरुणींनी काळ्याभोर रंगाचा एक प्रचंड आकाराचा प्राणी पोहत जाताना पाहिला. त्यातली एक तरुणी म्हणते, प्रचंड आकाराचा तो एक आवाढव्य मासा होता. त्याचं तोंड भयंकर होतं; पण त्याचा काही आवाज येत नव्हता. हा काही आम्हाला झालेला भास नव्हता. आम्ही तिघींनीही जलराक्षस स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आणि आम्हाला खूप भीती वाटली. त्या जलाशयातील विशालकाय प्राण्याबद्दल लोकांचं कुतूहल वाढतच गेलं आणि भीतीही. 1984 मध्ये हे कुतूहल एवढं वाढीला लागलं की, सरकारनं 80 फूट लांबीचा एक काचेचा पिंजरा तयार करून तलावात सोडला. हजारो उत्सुक नागरिक त्याला बघायला जमले. बर्‍याच लोकांना त्याचे फोटो काढायचे होते; पण तो महाकाय जलदैत्य काही पिंजर्‍यात शिरला नाही.

चीनमधील घनदाट जंगलात असलेल्या हानस तलावातूनही अनेक राक्षस-कथांचा जन्म झाला. जिनाजी यांग विद्यापीठातील संशोधकांनी त्या तलावात सफर केली. त्यांचे कष्ट काही वाया गेले नाहीत. त्यांना तो प्रचंड आकाराचा राक्षसी मासा दिसला. मात्र, त्याचा रंग तांबडा असल्याचं त्यांनी नमूद केलं. तो जलराक्षस काही मिनिटे पाण्याच्या पृष्ठभागावर आला होता आणि लोकांची चाहूल लागताच तो पाण्यात गायब झाला.

1982 मध्ये पोलंडमध्ये जेग्रेजिन्स्की तलावात सशाच्या कानासारखा आकार असलेला एक चमत्कारिक जलराक्षस दिसला. तोही अत्यंत वेगानं पोहत होता. तो काही तरुणांनी पाहिला. तिथल्या वर्तमानपत्रांत त्यांचा अनुभव प्रकाशित करण्यात आला. रशियाच्या कोल-कोल तलावात अनेक विचित्र प्राणी काठावरच्या लोकांच्या अंगावर चाल करून येत असल्याच्या तक्रारी लोकांनी मांडल्या. काही लोकांनी तर, हा प्राणी दुसरातिसरा कोणी नसून, पाण्यातील डायनासोर आहे, असं म्हटलेलं आहे. त्या प्राण्याची लांबी सुमारे 80 फूट असल्याची नोंद
त्यांनी केलेली आहे आणि असे आठ-दहा प्राणी तिथं दिसले होते.

असे प्रचंड आणि भयंकर आकाराचे प्राणी केवळ फार मोठ्या जलाशयातच होते, असं नाही; तर लहान लहान तळ्यांतही ते दिसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. राक्षसी मासे, प्रचंड वृक्षाकार मासे, घोड्याच्या तोंडाचे मासे असे अनेक प्रकारचे राक्षसी जीव लोकांनी छोट्या तलावांतही पाहिलेले आहेत. अशा सगळ्या कथांपैकी सर्वात जुनी बहुचर्चित कथा लॉक जलराक्षसाची आहे. त्यानं अनेक लोकांना, संशोधकांना आपल्याकडे खेचून घेतलं. 1983 मध्ये ‘द लॉक नेस मिस्ट्री सॉल्व्हड्’ हे पुस्तक रोनाल्ड बिन्स यांनी लिहिले. त्यात त्यांनी अशा राक्षसी जीवांचे सध्याच्या काळातील अस्तित्व नाकारलेलं आहे. हे राक्षसी मासे प्राचीन काळात होते, असंही ते म्हणतात.

तथापि, असे राक्षसी जीव जलाशयात दिसल्याच्याही अनेक घटना लोक सांगतात. 1966 मध्ये एक मच्छीमार मासे पकडत असताना अचानक लांबलचक-म्हणजे सुमारे शंभर फूट लांबीचा, तपकिरी रंगाचा राक्षसी जलचर त्याला जवळून दिसला. त्याचं मस्तक प्रचंड होतं. त्याचे डोळे मोठमोठे होते आणि ते चकाकत होते. काही मिनिटांतच तो राक्षसी मासा दिसेनासा झाला. त्याच मच्छीमारानं 1967 मध्ये काऊंटी कैरो येथील तलावात आणखी एक विचित्र जलचर पाहिला. तो सुमारे 70 फूट लांबीचा होता आणि अत्यंत भयंकर होता. 1979 मध्ये दोन शेतकर्‍यांनी पालीसारखे दिसणारे अवाढव्य आकाराचे काही पाण्यातले राक्षसी जीव पाहिले.

1980 मध्ये कॅनडा येथील क्रिस्टियाना तळ्यात राक्षसी जीवांची एक नर-मादी जोडी लोकांच्या द़ृष्टीस पडली. त्यांची तोंडे मोठ्या प्रचंड घोड्यासारखी होती. त्यांच्या चेहर्‍यावर लांब लांब केसही होते. डोळे लालभडक होते. जगभरात असे अनेक राक्षसी आकाराचे जलचर लोकांना दिसलेले आहेत. भारतातही काहीवेळा असे महाप्रचंड आकाराचे राक्षसी मासे दिसून आल्याचे मच्छीमारांनी सांगितलेलं आहे. पुराण काळातील अनेक कथांमध्ये अशा राक्षसी जलचरांचे वर्णन आढळते. सागराच्या पोटात आणखी अशी असंख्य रहस्ये दडलेली आहेत, याचे दाखले अनेक कथांमधून मिळतात.

Back to top button