Nagar : प्रशासक होताच आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर | पुढारी

Nagar : प्रशासक होताच आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महापालिका पदाधिकार्‍यांची पंचवार्षिक मुदत 27 डिसेंबर रोजी संपली आणि प्रशासकराज सुरू झाले. प्रशासकपदी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे विराजमान झाले. डॉ. जावळे यांनी आज प्रशासकपदाची सूत्रे हाती घेताच महापालिकेच्या सर्व विभागांची पाहणी केली. वेळेवर न येणार्‍या कर्मचार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली. महापालिका पदाधिकार्‍यांची पंचवार्षिक मुदत संपल्याचे पत्र राज्य निवडूणक आयोगाने मनपाला पाठविले. त्यात म्हटले होते की, मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका विहीत वेळेत घेणे शक्य होणार नसल्याने संबंधित संस्थेची मुदत संपताच प्रशासकाची नियुक्ती करावी. त्यामुळे नियोजित स्थायी समिती व सर्वसाधारण सभा रद्द झाल्या. महापालिकेच्या प्रशासकपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. राज्य शासनाच्या नगरसचिव विभागाने 27 डिसेंबर 2023 पासून महापालिका प्रशासकपदी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची नियुक्ती केल्याचा आदेश गरुवारी रात्री उशिरा काढला. त्यानुसार आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी आज प्रशासकपदाचा पदभार स्वीकारला.

प्रशासकपदाची सूत्रे हाती घेताच आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी शुक्रवारी मनपाच्या सर्व विभागांची पाहणी केली. बांधकाम, नगररचना, पाणीपुरवठा, घनकचरा आदी विभागांत जाऊन कर्मचार्‍यांचे हजेरी रजिस्टर तपासले. कर्मचार्‍यांना आपापली प्रशासकीय कर्तव्ये तत्परतेने पार पाडण्याचे स्पष्ट निर्देश दिले. गैरहजर कर्मचार्‍यांची माहिती मागवून विभागात असलेल्या अतिरिक्त कर्मचार्‍यांची देखील माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले. कामचुकार व निर्देशांचे अनुपालन करणार्‍या कर्मचार्‍यांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही डॉ. जावळे यांनी दिले आहेत.

लेटलतिफांना नोटिसा
आयुक्त डॉ. जावळे यांनी आज प्रशासकपदाचा पदभार घेल्यानंतर सर्व विभागांची पाहणी केली. उशिरा येणार्‍या सर्वच अधिकारी व विभागप्रमुखांना नोटिसा काढल्या. गैरहजर असणार्‍या शिपायांनाही नोटिसा काढल्या असून, त्यांची गैरहजेरी लावण्यात येणार आहे.

अस्वच्छतेबाबत संताप
आयुक्त डॉ. जावळे यांनी पाहणी केली तेव्हा अनेक विभागांत अस्वच्छता आढळून आली. त्यामुळे आयुक्तांनी संताप व्यक्त करीत शिपाई कर्मचार्‍यांना स्वच्छतेबाबत सक्त सूचना केल्या. तसेच, अधिकार्‍यांना महत्त्वाच्या फायली कार्यालयात जमा करण्यास सांगितले. तर, बिनकामाचे दप्तर नष्ट करण्याच्या सूचना दिल्या.

Back to top button