Pune : उसाच्या वाड्यांमुळे चाराटंचाईवर मात

Pune : उसाच्या वाड्यांमुळे चाराटंचाईवर मात

बावडा : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यामध्ये सध्या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाल्याने दूध उत्पादक शेतकर्‍यांना उसाचे वाडे सहजपणे उपलब्ध होत आहे. त्यामुळे सध्यातरी चाराटंचाईवर मात झाल्याचे चित्र आहे. इंदापूर तालुका हा ऊस उत्पादनाबरोबरच दूध उत्पादनातही राज्यात अग्रेसर आहे. ऊस व दुधामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली आहे. दिवाळीपासून तालुक्यात साखर कारखान्यांचे गळीत हंगाम चालू असल्याने जनावरांसाठी उसाचे वाडे हे हवे तेवढे व हवे त्या ठिकाणी, मुबलक प्रमाणावर सहजपणे उपलब्ध होत आहेत.

संबंधित बातम्या :

त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांना मोठा आधार मिळत आहे, अशी माहिती सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे संचालक व दूध उत्पादक शेतकरी अमरदीप काळकुटे (रेडणी), भारत लाळगे (सराफवाडी), विजयसिंह कानगुडे (शेटफळ हवेली), अमीर सय्यद (बावडा), शरद जगदाळे-पाटील (टणू) यांनी दिली. साखर कारखान्याकडे जाणार्‍या रस्त्यावर ऊस बैलगाड्या, ट्रॅक्टरमधून उसाचे वाडे दूध उत्पादक शेतकरी घेतानाचे चित्र दिसून येत आहे. इंदापूर तालुक्यात महिला वर्ग मोठ्या संख्येने दुग्धव्यवसाय सांभाळत आहे. इंदापूर तालुक्यात दूधगंगा दूध उत्पादक सहकारी दूध संघाबरोबर खाजगी संघांना शेतकरी दूध घालत आहेत. दूध उत्पादन खर्चामध्ये चार्‍याचा खर्च हाच सर्वाधिक असतो. इंदापूर तालुक्यात नीरा-भीमा, कर्मयोगी शंकररावजी पाटील, छत्रपती सहकारी, बारामती अ'ग्रो हे साखर कारखाने आहेत.

कारखाने बंद झाल्यावर उन्हाळी हंगामात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चाराटंचाई जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी शासनाने आतापासून नियोजन करण्याची गरज आहे. सध्या साखर कारखाने सुरू असल्याने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न सध्या तात्पुरत्या स्वरूपात संपुष्टात आल्याची माहिती प्रगतिशील शेतकरी शिवाजीराव शिंदे (शेटफळ हवेली), हरिश्चंद्र काकडे, रमजान शेख (बावडा), विलास ताटे देशमुख (नीरा नरसिंहपूर), गणेश अनपट (भोडणी) यांनी दिली. उसाचे वाडे हे जनावरांसाठी चांगले खाद्य आहे. जनावरांच्या पोषणासाठी वाड्याबरोबरच मिनरल मिक्स्चरही द्यावे, असे आवाहनही पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news