Pune News : मोबाईल परत मिळाला अन् जीव भांड्यात पडला.. | पुढारी

Pune News : मोबाईल परत मिळाला अन् जीव भांड्यात पडला..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मोबाईलच्या जमान्यात छोटा पडदा म्हणजेच सर्वकाही आहे. दिवसरात्र सोबत करणारा हा जिवलग मोबाईल हरविल्यानंतर खूपच दु:ख होते. पण, तोच परत मिळाला तर अपार आनंद होणारच. कामानिमित्त गडबडीत गहाळ झालेले, चोरी झालेले तब्बल 237 महागडे मोबाईल पुणे पोलिस दलाच्या परिमंडल-2 ने नागरिकांना मिळवून दिले आहेत. स्वारगेट, लष्कर, कोरेगाव पार्क, बंडगार्डन, भारती विद्यापीठ, सहकारनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात गहाळ झालेले मोबाईल संच नागरिकांना सुपूर्त करण्यात आले.

परिमंडल-2 मधील अधिकार्‍यांनी मोबाईल कंपनीकडे पाठपुरावा करून 33 लाखांचे मोबाईल परत मिळविल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर, सहायक आयुक्त संजय सुर्वे, वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, अनघा देशपांडे, सुनील झावरे या वेळी उपस्थित होते. मोबाईल गहाळ झाल्यानंतर नागरिकांनी ऑनलाइन तक्रार केली होती. नागरिकांनी पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर ’लॉस्ट अँड फाउंड’ पोर्टलवर तक्रारींची ऑनलाइन नोंद केली होती. त्यानुसार तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी माहिती काढली.

गहाळ झालेले मोबाईल परत मिळविण्यासाठी मोबाईल कंपन्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. तक्रारदारांचे गहाळ झालेले मोबाईल वापरणार्‍यांशी पोलिसांनी संवाद साधला. गहाळ झालेले मोबाईल वापरणार्‍यांनी पोलिसांना पुन्हा मोबाईल परत केले. हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे मनोमन आभार मानले.

मोबाईल हरविल्यानंतर नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार परिमंडल-2 मधील सर्व पोलिस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आणि संबंधित मोबाईल कंपन्यांकडे पाठपुरावा करून 237 मोबाईल जप्त करण्यात आले. ते मोबाईल मूळ वापरकत्र्यांना परत मिळवून देण्यात आले आहेत.

– स्मार्तना पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडल-2

पोलिसांकडून असाही सुखद अनुभव

मोबाईल हरविल्यानंतर त्याची तक्रार दिली जाते. पण, हरविलेला मोबाईल विनातक्रार आणि तोही पोलिसाकडूनच परत मिळाल्याचा सुखद अनुभव बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ’पुढारी’च्या एका वरिष्ठ पत्रकाराला आला. रात्रपाळीचे काम संपवून दुचाकीवरून ते स्वारगेटवरून आंबेगाव बु.॥च्या दिशेने घराकडे परतत होते. त्यावेळी रस्त्यात त्यांचा मोबाईल खिशातून पडला. घरी पोहचल्यानंतर ही बाब लक्षात आली. नेमका मोबाईल कुठे पडला असावा, याचा अंदाज आला आणि ते परत बालाजीनगर चौकात आले. त्या वेळी त्या ठिकाणी गस्तीवरील पोलिस व्हॅन उभी होती.

त्यातील पोलिस कर्मचारी संदीप चव्हाण यांना मोबाईल खिश्यातून पडल्याचे सांगून नंबर डायल करण्याची विनंती केली. संबंधित क्रमांकावर डायल केल्यानंतर पलीकडून धनकवडी पोलिस चौकीत कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी राहुल शिंदे यांनी फोन उचलला. मोबाईल रस्त्यात सापडला असून तो आपल्याकडे सुरक्षित आहे. चौकीत येऊन मोबाईल घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार पत्रकाराने रात्री 2 च्या सुमारास धनकवडी येथील पोलिस चौकीत जाऊन मोबाईल परत घेतला. तसेच गस्तीवरील पोलिस संदीप चव्हाण आणि मोबाईल परत करणारे पोलिस कर्मचारी राहुल शिंदे यांचे आभार मानले.

हेही वाचा

Back to top button