संस्था बळकटीकरणासाठी सर्वांचा पुढाकार हवा : दिलीप वळसे पाटीलांची अपेक्षा | पुढारी

संस्था बळकटीकरणासाठी सर्वांचा पुढाकार हवा : दिलीप वळसे पाटीलांची अपेक्षा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण अर्थव्यवस्थेतील शेतकरी ज्यांच्यावर अवलंबून आहे, अशा विविध कार्यकारी संस्थांना बळकट करण्यासाठी राज्य सहकारी बँकेसह सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. विकास सोसायट्यांना कर्जवसुली करण्यास त्रास होतो, तो कमी करण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असून त्यासाठी राज्य सहकारी बँकेने योजना आणावी, असेही ते म्हणाले.

आर्थिक शिस्त व तिचे महत्त्व पटवून देणार्‍या राज्य सहकारी बँकेच्या बँकिंग दिनदर्शिकेचे प्रकाशन /अनावरण वळसे पाटील यांच्या हस्ते बँकेच्या मुंबईतील मुख्यालयात गुरुवारी (दि.28) सायंकाळी झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या संकल्पनेतून ही दिनदर्शिका बँकेने प्रथमच तयार केली आहे. या वेळी अनास्कर यांच्यासह माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, बँकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी बँकेच्या आर्थिक प्रगतीची माहिती विद्याधर अनास्कर यांनी सांगितली. दिनदर्शिकेत आर्थिक शिस्त हाच यशस्वी उद्योगाचा मूलमंत्र ही संकल्पना राबविली आहे.

सहकार प्रशिक्षण व संशोधन केंद्र उभारा

राज्य सहकारी बँकेने फक्त बँकिंग क्षेत्रापुरते मर्यादित राहील, असे स्वतःचे प्रशिक्षण व संशोधन केंद्र उभारावे. त्यात गावातल्या सहकारी संस्थांच्या सचिवांपासून ते अगदी बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकांपर्यंत सर्वांना नियमित प्रशिक्षण द्यावे. नियुक्त झाल्यावरही त्यांना कामाचे थेट प्रशिक्षण द्यावे व कामावर असताना त्यांच्या चाचण्या या संस्थेमार्फत घ्याव्यात, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही या वेळी बोलताना पाटील यांनी केली.

हेही वाचा

Back to top button