वस्तुसंग्रहालयांशी वाढला संवाद; ऐतिहासिक वस्तूं पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी | पुढारी

वस्तुसंग्रहालयांशी वाढला संवाद; ऐतिहासिक वस्तूं पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

सुवर्णा चव्हाण

पुणे : डिसेंबर ते फेब्रुवारी म्हणजे पर्यटनाचा सीझन. याच सीझनमध्ये आता पर्यटकांची पावले पुण्यातील वस्तुसंग्रहालयांकडे वळली आहेत. ऐतिहासिक आणि दुर्मीळ वस्तूंचे जग पाहण्यासाठी पर्यटक संग्रहालयांमध्ये गर्दी करत आहेत. एका वस्तुसंग्रहालयात रोज किमान 450 ते 500 पर्यटक भेट देत आहेत. एकूणच पर्यटकांचा या वस्तूंशी संवाद वाढू लागला आहे.
पश्चिम बंगालपासून ते गुजरातपर्यंत… अमेरिकेपासून ते सिंगापूरपर्यंतचे पर्यटक भेट देत असून, वस्तुसंग्रहालयांना यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच याचा आर्थिकदृष्ट्याही संग्रहालयांना फायदा होत आहे.

पुण्यात अंदाजे 30 हून अधिक संग्रहालये आहेत. ऐतिहासिक आणि दुर्मीळ वस्तूंचा खजिना येथे आपल्याला पाहायला मिळेल. कोरोना काळात संग्रहालयांना भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या घटली होती. पण, कोरोनाकाळानंतर स्थिती सुधारल्यानंतर मागील वर्षीपासून संग्रहालयांना भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यात आताच्या सीझनमध्ये, तर नोव्हेंबरपासून संग्रहालयांमध्ये येणार्‍या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि महिन्याला किमान 10 ते 15 हजार पर्यटक संग्रहालयांना भेट देत आहेत. फक्त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधूनच नव्हे, तर गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी राज्यांतून पर्यटक संग्रहालयांना भेट देत आहेत.

देवदेवेश्वर संस्थानचे (पर्वती-कोथरूड) प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित म्हणाले, पर्वती येथील पेशवे संग्रहालयात ऐतिहासिक काळातील जुन्या वस्तू, भांडी, शस्त्र, कागदपत्रे, छायाचित्रे, दिवे, काही प्रसंग चित्रे संग्रहित आहेत. त्यामुळे त्याला मोठे महत्त्व आहे. या संग्रहालयाला जुनी ऐतिहासिक पार्श्वभूमी असून, त्याला दरवर्षी असंख्य पर्यटक भेट देतात. यंदा सीझनमध्ये भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या नक्कीच वाढली आहे. यंदाचा सीझन खूप चांगला असून, रोज किमान अंदाजे 500 पर्यटक संग्रहालयातील दुर्मीळ वस्तू पाहण्यासाठी येत आहेत.

विकेंड्सला गर्दी

सध्याचा सुट्यांचा काळ आणि पर्यटनाचा सीझन यामुळे खासकरून विकेंड्सला म्हणजेच शनिवारी आणि रविवारी संग्रहालयांना भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या जास्त आहे. कोथरूड, बाजीराव रस्ता, शिवाजीनगर, पुणे स्टेशन परिसर, औंध, पर्वती आदी ठिकाणी असलेल्या संग्रहालयांना विकेंड्सला चांगला प्रतिसाद मिळत असून, यामुळे संग्रहालयांना त्याचा आर्थिक फायदा होत आहे.

नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा सीझन संग्रहालयांसाठी खूप महत्त्वाचा असतो. या काळात मोठ्या संख्येने पर्यटक संग्रहालयात येतात. कोरोनामुळे ही घडी विस्कटली होती. पण, परिस्थिती सुधारल्यानंतर मागील वर्षीपासून पर्यटकांची संख्या वाढली असून, यंदाही तोच प्रतिसाद आहे.

– सुधन्वा रानडे, संचालक, राजा दिनकर केळकर संग्रहालय.

हेही वाचा

Back to top button