गौतम अदानी यांची विद्या प्रतिष्ठानला 25 कोटींची मदत : शरद पवार | पुढारी

गौतम अदानी यांची विद्या प्रतिष्ठानला 25 कोटींची मदत : शरद पवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठानला उद्योगपती गौतम अदानी यांनी 25 कोटी रुपयांची मदत केली असल्याची जाहीर कबुली देत अदानी यांचे आभार मानले आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग अँड रोबोटिक ऑटोमेशन हे सेंटर फॉर एक्सलन्स स्थापन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी शरद पवार, उद्योगपती दीपक छाब्रिया यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, या टेक्नॉलॉजी सेंटरच्या निर्मितीसाठी 25 कोटी रुपयांची गरज होती. उद्योगपती गौतम अदानी यांनी त्यासाठी मदत केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

संस्थेच्या वतीने जगातील पहिले नवे टेक्नॉलॉजी सेंटर बनवत आहोत. 25 कोटी रुपयांची मदत करणार्‍या अदानी यांचे नाव मला या ठिकाणी घ्यावे लागेल, असे पवार यांनी सांगितले. उसापासून साखर बनविण्यासाठीचे तंत्रज्ञान जगात झपाट्याने बदलत आहे, असे तंत्रज्ञान येथे आणता येईल का, यासाठी आमचा प्रयत्न असेल. जगात जे नवीन आहे ते सगळे आपल्या भागात यावे, असा आमचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले. इंजिनिअरिंग क्षेत्रात टेक्नॉलॉजीचा वापर झपाट्याने वाढत आहे. आपणही नवा बदल स्वीकारला पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारावर काम करणार्‍या लोकांची देशाला आणि जगाला गरज आहे. आपण ते बारामतीत उभे करत आहोत त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होईल, असेही पवार यांनी सांगितले.

Back to top button