मागोवा 2023 : हेरगिरी, इसिस मॉड्यूल, ललित पाटीलने गाजले वर्ष | पुढारी

मागोवा 2023 : हेरगिरी, इसिस मॉड्यूल, ललित पाटीलने गाजले वर्ष

अशोक मोराळे/ महेंद्र कांबळे

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डीआरडीओ) संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याला संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याच्या आरोपावरून झालेली अटक, पुणे पोलिसांनी कोथरूड येथून तिघा दहशतवाद्यांना पकडल्यानंतर पुढे खोदली गेलेली इसिसची पाळेमुळे, त्याचबरोबर ड्रगमाफिया ललित पाटील याच्या ससून रुग्णालयातील ड्रग रॅकेटचा केलेला पर्दाफाश, अशा विविध घटनांनी पुणे 2023 मध्ये देशभरात गाजले. तर, कायदा व सुव्यवस्था चोख ठेवत पोलिसांनी मोक्काची शंभरी पार केली.

ललना झारा दासगुप्ता अन् डॉ. कुरुलकर

झारा दासगुप्ता या पाकिस्तानी ललना तथा गुप्तहेर महिलेच्या हनिट्रॅपमध्ये अडकून देशाच्या संरक्षणक्षेत्राची महत्त्वपूर्ण माहिती पाकिस्तानला पुरविल्याप्रकरणी डीआरडीओचा संचालक तथा शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याला संस्थेच्या अंतर्गत अहवालानंतर दहशतवाद विरोधी (एटीएस) पथकाने अटक केली. ही कारवाई एप्रिल 2023 मध्ये करण्यात आली. पुढे तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर आली. सध्या या गुन्ह्याचा तपास एटीएसकडून सुरू आहे. कुरुलकरच्या मोबाईलच्या पासवर्डमध्ये तपास यंत्रणा अद्यापही अडकल्याचे चित्र आहे. तत्पूर्वी, त्याच्यावर केवळ ऑफिशिअल सिक्रेट अ‍ॅक्टनुसार कारवाई केल्याने विधानसभेत यावरून गदारोळ झाला होता. त्याच्यावर यूएपीएअंतर्गत कारवाई करण्याचीही मागणी विरोधी पक्षाने केली होती.

दहशतवाद्यांना बेड्या आणि इसिसचा पर्दाफाश

दुचाकी चोरी करताना कोथरूड पोलिसांनी तिघांना पकडले. चौकशीत ते तिघे अल् सुफा या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचे समोर आले. मागील काही महिन्यांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणा त्यांच्या मागावर होत्या. पुढे पुणे पोलिस, एटीएस तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांनी संयुक्त तपास करीत इसिसची भारतातील पाळेमुळे खोदून काढली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ देशातील सर्व तपास यंत्रणांना अलर्ट केले.

त्यांच्याच कारवाईमुळे देशात विविध ठिकाणी कारवाई करीत अनेक दहशतवाद्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. प्रामुख्याने या कारवाईत केंद्रस्थानी राहिले ते पुणे, मुंबई, ठाणे, पालघर तसेच कोल्हापूर, सातारा, सासवड, रत्नागिरी ही शहरे. एनआयएच्या तपासातून पुढे आलेल्या माहितीनुसार व त्यांच्याकडून आढळून आलेल्या स्फोटके तयार करण्याच्या साहित्यानुसार हे दहशतवादी देशभरात 26/11 पेक्षा मोठे घातपाती कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले. हा तपास सुरू असून, या मॉड्यूलचा पर्दाफाश खर्‍या अर्थाने पुणे पोलिसांनी केल्यानेच पुढील लिंक ओपन झाली.

पुणे पोलिसांकडून ललित पाटीलवर कारवाई

ससून रुग्णालयातून चालणार्‍या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर अटकेच्या भीतीने ससून रुग्णालयातून पळून गेलेल्या ललित पाटीलला पुणे पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. त्याच्या आणि त्याच्या साथीदारांच्या चौकशीत अमली पदार्थतस्करीचे सर्व जाळे उघड झाले. यादरम्यान ड्रगचे कारखानेही पोलिसांनी उद्ध्वस्त केले. ड्रगतस्करीत मोक्काची झालेली ही पहिली कारवाई होती. पुणे पोलिसांनी 2023 मध्ये तब्बल 18 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करून तस्करांचे कंबरडे मोडले. त्यातील 12 कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ रांजणगाव येथील एमईपीएल कंपनीच्या भट्टीमध्ये दोनवेळा नष्ट केले आहेत.

हेही वाचा

Back to top button