थेट चंद्रावर वीजपुरवठा करणार ‘ही’ कार कंपनी | पुढारी

थेट चंद्रावर वीजपुरवठा करणार ‘ही’ कार कंपनी

लंडन : पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र. अपोलो मोहिमांमध्ये चंद्रावर अनेक अंतराळवीर जाऊन आले. त्यानंतरच्या काळातही विविध देशांच्या अंतराळ संशोधन संस्थांनी चंद्राबाबत संशोधन करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या आहेत. भारताचेही ‘चांद्रयान-3’ मधील लँडर व रोव्हर चंद्रावर उतरले. अमेरिकेने आता पुन्हा एकदा चंद्रावर माणूस पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.

अनेक देशांनी तर पृथ्वीवर अंटार्क्टिका म्हणजे दक्षिण ध्रुवावर ज्याप्रमाणे विविध देशांची संशोधन केंद्र आहेत तशी चंद्रावरही स्थापन करण्याची तयारी केली आहे. चंद्रावर बेस कॅम्प तयार केल्यास वीज ही सर्वात प्राथमिक गरज असणार आहे. ‘रोल्स रॉयस’ ही प्रसिद्ध कार निर्माता कंपनी चंद्रावर वीज पुरवठा करणार आहे. यासाठी कंपनी मिनी न्यूक्लियर पॉवर प्लँट निर्माण करणार आहे.

चंद्रावर बेस कॅम्प तयार करणार्‍या कंपन्यांना वीज उपलब्ध करून देण्याचे काम ही कंपनी करणार आहे. आयर्लंडमधील बेलफास्ट येथे नुकतीच एक अंतराळ परिषद पार पडली. या परिषदमध्ये रोल्स रॉयस कंपनीने आपल्या अनोख्या प्रोजेक्टची घोषणा केली. कंपनीने या परिषदेत मिनी न्यूक्लियर प्लँटचे मॉडेल सादर केले. 40 इंच रुंद आणि 120 इंच लांबीची ही मिनी अणुभट्टी आहे. या प्लँटच्या माध्यमातून चंद्रावर उभारल्या जाणार्‍या बेस कॅम्पला अर्थता मानवी वस्तीला वीजपुरवठा केला जाणार आहे. यूके स्पेस एजन्सीचे मुख्य कार्यकारी पॉल बेट यांनी या प्रकल्पाबाबत अधिक माहिती दिली. इंग्लंडच्या स्पेस एजन्सीने या मिनी न्यूक्लियर पॉवर प्लँटसाठी रोल्स रॉयस कंपनीला सुमारे 30.62 कोटी रुपयांचा निधी दिला होता.

रोल्स रॉयसचे अभियंते आणि शास्त्रज्ञ सध्या आण्विक विखंडन अणुभट्टीतून उत्सर्जित होणार्‍या उष्णतेपासून ऊर्जा कशी निर्माण करायची यावर संशोधन करत आहेत. येत्या सहा वर्षांत या अणुभट्टीतून वीजनिर्मितीचा प्रयोग यशस्वीपणे कार्यान्विक होऊ शकतो अशी संशोधकांना अपेक्षा आहे. 2030 पर्यंत ते ही मिनी अणुभट्टी कार्यान्वित होईल असा कंपनीने दावा केला आहे. चंद्राच्या फक्त एकाच भागात सूर्य प्रकाश आहे. तिथे ऊर्जा निर्मितीसाठी सौर ऊर्जेचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, दुसरा भाग हा कायम अंधारात असतो. येथे विजेचे सोय उपलब्ध करून देणे रोल्स रॉयसच्या मिनी न्यूक्लियर पॉवर प्लँटचा उद्देश आहे.

Back to top button