कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पदोन्नतीमध्ये मांडण्यात येणारा 'बाजार' पारदर्शी कारभारामुळे यावेळी उधळला. त्यामुळे कारभार्यांची चांगलीच अडचण झाल्याचे बोलले जाते. दरम्यान, पदोन्नती झालेल्या कर्मचार्यांना गुरुवारी ऑर्डर देऊन जिल्हा परिषद प्रशासनाने नवीन वर्षाची भेट दिली. त्यामुळे कर्मचार्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. (Kolhapur News)
जिल्हा परिषदेतील बदली आणि बढती हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. यामध्ये पदाधिकार्यांना विशेष 'रस' असायचा. परंतू गेल्या दोन वर्षापासून प्रशासक असल्यामुळे सर्व बाबी प्रशासनाच्या हातात आहेत. त्यामुळे यामधील घोळ थांबेल, अशी अपेक्षा होती. परंतू गेल्या वर्षभरातील अनुभव नेमका उलटाच आला. बदली आणि बढती या प्रशासकीय बाबी असल्यामुळे पदाधिकार्यांचा हस्तक्षेप नसल्याने त्या लवकर होतील, अशी अपेक्षा होती. परंतू पदाधिकारी नसले तरी प्रक्रिया राबविणारी यंत्रणा तीच असल्यामुळे त्यात फारसा फरक पडला नाही. त्यामुळेच गेल्या दीड ते दोन वर्षापासून आरोग्य विभागातील कर्मचार्यांना पात्र असूनही पदोन्नतीसाठी प्रतिक्षा करावी लागली. (Kolhapur News)
आरोग्य विभागातील पदोन्नती वर्षभरापेक्षा अधिक काळाहून रखडल्या होत्या. काही कर्मचार्यांचे सी.आर.च गायब झाल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे पदोन्नतीमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला होता. डॉ. राजेश गायकवाड यांनी जिल्हा आरोग्य अधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर याबाबत त्यांच्याकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी त्याची गंभीर दखल घेत सी.आर. शोधण्यासाठी विभागातील काही अधिकार्यांवर जबाबदारी सोपविली. ज्यांनी सी.आर. गायब केल्याची चर्चा होती त्यांच्यावरच जबाबदारी सोपविल्यामुळे सी.आर. सापडले. त्यामुळे पदोन्नतीला गती आली.
पदोन्नती करत असताना प्रथम ज्येष्ठता यादीनुसार कर्मचार्यांची यादी जाहीर केली जाते. पदोन्नतीच्या ऑर्डर दिल्या जातात, त्यानंतर त्यांना पदस्थापना देण्यात येते. या संधीचा फायदा घेऊन कारभारी पदस्थापनेसाठी बाजार मांडत होते. त्यामुळे त्याची जिल्हा परिषदेत चर्चा होत असे. पदोन्नतीनंतर सोयीचे ठिकाण मिळावे यासाठी कर्मचारी आपापल्या परीने प्रयत्न करत असत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात 'अर्थपूर्ण' चर्चा केल्या जायच्या.
यावेळी मात्र पदोन्नती आणि पदस्थापनेसाठी समुपदेशनाची प्रक्रिया एकाच दिवशी राबविल्याने कारभार्यांना अर्थपूर्ण चर्चा करण्याची संधीच मिळाली नाही. अलीकडील काळात एकाचवेळी 60 कर्मचार्यांना पदोन्नती देण्याची आरोग्य विभागातील पहिलीच घटना आहे.
निवृत्तीच्या आदल्या दिवशी पदोन्नती
पदोन्नती रखडल्यामुळे काही कर्मचार्यांना त्याचा फटका बसला. पदोन्नती मिळालेल्या कर्मचार्यांमध्ये एक कर्मचारी दि. 30 डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहे. त्यामुळे निवृत्तीच्या आदल्या दिवशी प्रमोशन अशी चर्चा आरोग्य विभागात सुरू होती.