धक्कादायक ! मुख्याध्यापकांकडूनच मराठा समाजाला दाखले देण्यास टाळाटाळ

धक्कादायक ! मुख्याध्यापकांकडूनच मराठा समाजाला दाखले देण्यास टाळाटाळ

बारामती : पुढारी वृत्तसेवा : पूर्वजांचा मराठा कुणबी असल्याचा शाळा सोडल्याचा दाखला देण्यास बारामती तालुक्यातील प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक टाळाटाळ करत आहेत. मराठा समाजातील अनेकजण दाखल्यांसाठी हेलपाटे मारत आहेत. परंतु मुख्याध्यापक त्यांना दाद देत नाहीत. कारण विचारले तर वरिष्ठांकडून आदेश आहेत, असे सांगितले जात आहे. वरिष्ठही या प्रश्नी कानावर हात ठेवत आहेत. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालकांनाच हा अनुभव आला. विशेषतः वडगाव निंबाळकर परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक विनंती अर्ज केल्यानंतरही आणि दाखल्यासाठीचे आवश्यक शुल्क भरण्यास तयार असतानाही दाखले दिले जात नाहीत, अशी स्थिती आहे.

संबंधित बातम्या :

दुसर्‍या घटनेत जिल्हा परिषदेच्या वडगाव शाळेत कार्यरत असणार्‍या एका शिक्षकास शाळा सोडल्याचा दाखला मिळवण्यासाठी तब्बल महिन्याचा काळ मोजावा लागला. खूप आटापिटा केल्यानंतर त्यांना आपल्या पूर्वजांचा दाखला मिळाला. सोमेश्वरच्या माजी संचालकांनी आठ दिवस हेलपाटे मारल्यावर आणि वरिष्ठांपर्यंत फोनाफोनी केल्यावर मुख्याध्यापिकेने दाखला दिला. त्यासाठी त्यांना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय साहाय्यकापर्यंत जावे लागले. तसेच पंचायत समितीच्या शिक्षण खात्यातील अधिकार्‍यांचीही मनधरणी करावी लागली. समाजात मानाचे स्थान असणार्‍या मंडळींना दाखले मिळण्यास एवढी अडचण येत असेल, तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. तालुक्यात बर्‍याच गावांत कुणबी नोंदी आढळलेल्या असल्याने लोक शाळा सोडल्याच्या दाखल्याची मागणी करत आहेत. परंतु काही ठिकाणी मुद्दाम लोकांची अडवणूक होत आहे. अडवणूक करणार्‍या मुख्याध्यापकांची शासकीय पातळीवर चौकशी करून त्यांना योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी मराठा समाजाकडून होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news