

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बाणेरमधील सूस रस्त्यावरील कचरा प्रकल्प त्वरित बंद करावा, या मागणीसाठी कोथरूडच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी बुधवारी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. यामुळे कुलकर्णी आणि अधिकार्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. अखेर, यावर शुक्रवारी बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेने 2016 मध्ये सूस रस्त्यावर नोबेल एक्स्चेंज कंपनीचा कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. त्या ठिकाणी शहरातील हॉटेलमधील ओला कचरा येतो. कचर्याच्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांचा त्याला विरोध आहे.
याविरोधात स्थानिकांनी ऑक्टोबर 2020 राष्ट्रीय हरित लवादात (एनजीटी) याचिका दाखल केली होती. त्यामध्ये नागरिकांच्या बाजूने निर्णय आला. या निर्णयाला महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, तेथेही निर्णय नागरिकांच्या बाजूने आला. तसेच दोन महिन्यांत हा प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले. मात्र, महापालिका तीन वर्षांपासून नवीन जागा मिळत नाही, असे कारण पुढे करत प्रकल्पाचे स्थलांतर करण्यास टाळाटाळ करत आहे, असा आरोप माजी आमदार कुलकर्णी यांनी केला.
नोव्हेंबर महिन्यात माजी आमदार कुलकर्णी व स्थानिक नागरिकांनी पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्या वेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार हे उपस्थित होते. त्या वेळी पालकमंत्र्यांनी महापालिकेने 31 डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प बंद असे आदेश दिले. मात्र, अद्याप प्रकल्प बंद झालेला नाही, तर उलट जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले, असा आरोप करत कुलकर्णी या नागरिकांना घेऊन बुधवारी अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांना भेटल्या. या वेळी त्यांनी हा प्रकल्प त्वरित बंद करण्याची मागणी करत प्रशासनाला धारेवर धरले. त्या वेळी डॉ. खेमनार यांनी प्रशासनाची बाजू मांडली, पण त्यावर नागरिकांचे समाधान झाले नाही. त्यावरून कुलकर्णी व खेमनार यांच्यात खडाजंगी झाली. अखेर यावर शुक्रवारी बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा