Pune News : पीएमपीएमएला हजार कोटी संचलन तूटीची झळ | पुढारी

Pune News : पीएमपीएमएला हजार कोटी संचलन तूटीची झळ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपीएमएल) ची संचलन तूट दरवर्षी वाढतच जात आहे. चालू वर्षाची संचलन तूट एक हजार कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह पीएमआरडीए हद्दीत पीएमपीएमएलकडून बस सेवा दिली जाते. त्यातून पीएमपीएमएलला उत्पन्न मिळत असले, तरी खर्चाचे प्रमाण अधिक आहे. पीएमपीएमएलमध्ये अकरा हजार कर्मचारी कार्यरत असून, त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.

इंधनाचे दरही वाढले आहेत. पीएमपीएमएलच्या ताफ्यात खासगी ठेकेदारांच्या बसगाड्यांचे प्रमाण मोठे असून, त्या बदल्यात त्यांना भाडेरक्कम द्यावी लागते. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पीएमपीएमएलने बससेवा सुरू केली असून, त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे पीएमपीएमएलचा तोटा दरवर्षी वाढतच आहे. यंदा पीएमपीएमएलला 600 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता असून, एक हजार कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी (2022-23) पीएमपीएमएलला 510 कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

परंतु, पीएमपीएमएलचा खर्च एक हजार 162 कोटी रुपये इतका होता. या तोट्याचा भार पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांसह पीएमआरडीएला सहन करावा लागत असून, पुढील वर्षांत पुणे महापालिकेला 500 कोटी रुपयांची संचलन तूट पीएमपीएमएलला द्यावी लागेल, असा अंदाज महापालिका प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

पीएमपीएमएलला यावर्षी एक हजार कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता आहे. पीएमपीएमएलला सध्या महिन्याला 50 कोटींचे उत्पन्न मिळते. याप्रमाणात खर्च अधिक आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न पीएमपीएमएल प्रशासनाकडून करण्यात येत आहे. येणार्‍या पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात येणार आहे.

विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

हेही वाचा

Back to top button