एकापाठोपाठ दहा सिलिंडरचे स्फोटाने विमाननगर हादरले; जीवितहानी नाही | पुढारी

एकापाठोपाठ दहा सिलिंडरचे स्फोटाने विमाननगर हादरले; जीवितहानी नाही

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सिलिंडरच्या बेकायदा गोदामात बुधवारी दुपारी विमाननगर परिसरात मोठा स्फोट झाला. एकापाठोपाठ सहा सिलिंडरचे स्फोट झाल्याने परिसरात घबराट पसरली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बेकायदा साठवणूक करण्यात आलेले 100 सिलिंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. विमाननगरमधील सिंबायोसिस कॉलेजजवळ रोहन मिथिला नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. तेथे जवळच मजुरांची वसाहत (लेबर कॅम्प) आहे. वसाहतीच्या परिसरात काही अंतरावर एका व्यावसायिकाने गोदामात बेकायदा घरगुती, तसेच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचा मोठा साठा केला आहे.
बुधवारी दुपारी गोदामातील सिलिंडरला आग लागली आणि एकापाठोपाठ दहा सिलिंडरचे स्फोट झाल्याने परिसर हादरला. स्फोटानंतर आगीचे लोळ झेपावल्याने परिसरात घबराट उडाली. त्याची झळ शेजारी असलेल्या मजुरांच्या झोपड्यांना पोहोचली. मजुरांच्या झोपड्या आणि गृहोपयोगी साहित्य आगीत भस्मसात झाले. या घटनेची माहिती मिळताचच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग भडकल्याने अग्निशमन दलाने जादा कुमक मागवली. अग्निशमन दलातील 30 जवानांनी पाण्याचा मारा करून नियंत्रण मिळवले. जवानांनी गोदामात साठवणूक केलेले 100 सिलिंडर बाजूला केल्याने अनर्थ टळला. आगीची घटना समजल्यावर वसाहतीतील महिला आणि मुले बाहेर पळाल्याने बचावले. स्फोटांमुळे परिसरात घबराट उडालीहोती.  विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.
सिलिंडरच्या साठ्याला आग; 
बेकायदा सिलिंडरचा साठा
शहराच्या वेगवेगळ्या भागात काहीजण बेकायदा गॅस सिलिंडरचा साठा करत आहे. शहरात अशाच पध्दतीने घरगुती, तसेच व्यावसायिक वापराचे सिलिंडर जादा दराने विक्री करत असून, पत्र्याचे शेडमध्ये बेकायदा सिलिंडरचा साठा करून ठेवण्यात आला आहे. यापूर्वी शहरात बेकायदा सिलिंडर साठवणूक करण्यात आलेल्या गोदामांना आग लागल्याची घटना घडल्या होत्या. यापूर्वीही भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 23 गॅस सिलिंडर फुटले होते. या ठिकाणी पलटी मारून सिलिंडर भरले जात असल्याचे तपासात समोर आले होते.
दीपक देवकर यांच्या मोकळ्या जागेत एका पत्र्याच्या शेडमध्ये गॅस सिलिंडरचा साठा करून ठेवण्यात आला होता. त्यापैकी सहा सिलिंडरचा स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. या घटनेत कोणी जखमी झाले नाही. सिलिंडरचा साठा कोणी केला, याची माहिती घेऊन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– आनंदराव खोबरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
हेही वाचा

Back to top button