डिंभे धरणाच्या घोड शाखेला सोडले आवर्तन; रब्बी गामातील पिकांना होणार लाभ | पुढारी

डिंभे धरणाच्या घोड शाखेला सोडले आवर्तन; रब्बी गामातील पिकांना होणार लाभ

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या घोड शाखेत आवर्तन सोडण्यात आले आहे. रब्बी हंगामातील पिकांना त्याचा मोठा लाभ मिळणार आहे. आवर्तन सोडल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. डिंभे धरण कालव्याची घोड शाखा आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी, कारफाटा, थोरांदळे, नागापूर, खडकी, भराडी या गावांना वरदान ठरली आहे. यंदा या परिसरात पाऊस कमी पडला, त्यामुळे आतापासूनच पाण्याचा तुटवडा पिकांना भासू लागला आहे. या परिसरातील शेतकर्‍यांनी रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा या पिकांबरोबरच ऊस, चारापिके मोठ्या प्रमाणावर घेतली आहेत.

या पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज होती. जलसंपदा विभागाने रब्बी हंगामातील पहिले आवर्तन घोड शाखेत सोडले, त्यामुळे गहू, हरभरा, कांदा या पिकांना मोठा लाभ होणार आहे. जाधववाडी, कारफाटा (रांजणी), थोरांदळे या गावांमध्ये शेतकरी दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात. प्रत्येक शेतकर्‍याकडे दूध देणारी जनावरे मोठ्या प्रमाणावर आहेत. चारा पिकांना सध्या पाण्याची टंचाई भासत आहे. घोड शाखेला आवर्तन सोडण्यात आल्याने चारा पिकांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शेतकर्‍यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button