

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समिती आळेफाटा उपबाजारात नवीन लाल कांद्यांची आवक वाढतच आहे, तर दर हे घसरलेले आहेत. मंगळवारी (दि. 26) झालेल्या लिलावात 33 हजार 800 गोणी कांदा शेतकर्यांनी विक्रीस आणल्याची माहिती सभापती संजय काळे, संचालक प्रीतम काळे यांनी दिली. आळेफाटा उपबाजारात डिसेंबर महिन्याच्या सुुरुवातीपासून नवीन लाल कांदा विक्रीस येण्याचे प्रमाण वाढले. त्यावेळी कांद्यास दर समाधानकारक मिळत होता. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला अन् दरात घसरण झाली. त्यानंतरही दरात आणखीन घसरण झाली.
सध्या मिळत असलेल्या दरामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. आळेफाटा उपबाजारात गेल्या 15 दिवसांपासून आवक वाढतच असल्याचे दिसून येते. तालुक्यातील तसेच शेजारील पारनेर, संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कांदा येथे विक्रीस येत आहे. मंगळवारी झालेल्या लिलावात प्रति 10 किलोस 251 रुपये कमाल दर मिळाल्याची माहिती सचिव रूपेश कवडे, कार्यालयप्रमुख प्रशांत महांबरे यांनी दिली. नवीन लाल कांद्यास मिळालेले प्रति 10 किलोचे दर पुढीलप्रमाणे : गोळा व सुपर गोळा 210 ते 251 रुपये, सुपर मेडीयम 180 ते 210 रुपये, गोल्टा 150 ते 180 रुपये, बदला व चिंगळी 70 ते 150 रुपये.
हेही वाचा