अजित दादांच्या आव्हानाचे माझ्यावर दडपण नाही : खा. अमोल कोल्हे | पुढारी

अजित दादांच्या आव्हानाचे माझ्यावर दडपण नाही : खा. अमोल कोल्हे

पुणे : पुढारी ऑनलाइन डेस्क : अजित दादा स्वतःच्या गावासह मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत, असा अप्रत्यक्ष टोला खासदार अमोल कोल्हें यांनी अजित पवार या लगावला आहे. अजित दादांच्या आव्हानाचे माझ्यावर दडपण नाही, असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलेय. अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार, असं अजित पवार मागे म्हणाले होते. तसेच अमोल कोल्हेंवर घणाघाती टीका सुद्धा केली होती. त्यानंतर या सर्व टिकेवर खासदार अमोल कोल्हे यांनी आज आपले मत व्यक्त केले.

किल्ले शिवनेरीपासून शेतकरी महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा सुरू झाला आहे. या मोर्चाचे नेतृत्व करणारे खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलतांना अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. कोल्हे म्हणाले की माझ्यावर अजित दादांच्या आव्हानाचे कोणतेही दडपण नाही. चार दिवसांचा हा अक्रोश मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावातून आणि बारामती या त्यांच्या बालेकिल्ल्यातून जाणार आहे. अजित पवारांच्या बारामती मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळेही या मोर्चाच्या केंद्रस्थानी असणार आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढू..

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही लढत आहोत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. आढळराव गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत. आढळराव यांना माझ्याकडून शुभेच्छा. ते एक वयस्क नेते आहेत डिजिटल युगाची त्यांना माहिती नसावी. कांदा निर्यात बंदी उठवावी अशी आमची साधी मागणी आहे. निवडणूक हा भाग गौण आहे, मिळणाऱ्या पदाला काय चाटायचे आहे का? आमच्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असे अमोल कोल्हे म्हणाले.

ही यात्रा सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न संदर्भात आहे कोणी हिला रोखू शकणार नाही, असेही अमोल कोल्हे म्हणाले.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळायला लागले, तेंव्हा कांदा निर्यात धोरण आणलं. आपण रस्त्यावर उतरलो तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जपानमधून ट्विट केलं, शेतकऱ्यांचा कांदा नाफेडद्वारे खरेदी करणार, किती जणांचा कांदा खरेदी झाला, असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केलाय.

दूध उत्पादक शेतकऱयांची फसवणूक करतात. सरकारी दूध डेअरी मध्ये 5 टक्के अनुदान मात्र खाजगी दूध डेअरी मध्ये अनुदान नाही. असा भेदभाव का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 25 लाख कोटींचे कर्ज मोठ्या उद्योजकांचे माफ होतात, पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही. त्या शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत असेल, तर सरकारला लाज वाटायला हवी. आता या मोर्चाबद्दल बोलत सुटले आहेत. त्या मोठ्या व्यक्तींना काही वाटत असेल तर त्यांनी शेतकऱ्यांचं हित लक्षात घ्यावे. आता लढायचं, थांबायचं न्हाय, असे अमोल कोल्हे म्हणाले.

हेही वाचा

Back to top button