बार्टी, सारथी, महाज्योती फेलोशिप परीक्षा, आता 10 जानेवारीला होणार | पुढारी

बार्टी, सारथी, महाज्योती फेलोशिप परीक्षा, आता 10 जानेवारीला होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या पीएच.डी. फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ झाल्याने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या 10 जानेवारीला पुन्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याचे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या फेलोशिपसाठी दोन दिवसांपूर्वी परीक्षा घेण्यात आली. पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून घेण्यात आलेल्या या परीक्षेत 2019 झालेल्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका जशीच्या तशी विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मंगळवारी सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सारथीचे वरिष्ठ अधिकारी आणि महाज्योती संस्थेचे प्रमुख ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. बैठकीनंतर विद्यापीठाच्या सेट परीक्षा समन्वयक यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता, येत्या 10 जानेवारीला पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सबंधित संस्थांच्या संकेतस्थळावर परीक्षेची सविस्तर माहिती तसेच वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

हेही वाचा

Back to top button