शंभरावे नाट्य संमेलन संस्मरणीय ठरेल : उपमुख्यमंत्री अजित पवार | पुढारी

शंभरावे नाट्य संमेलन संस्मरणीय ठरेल : उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड शहरात साहित्य, कला, सांस्कृतिक, संस्कृती, नाट्य चळवळ वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा मान पिंपरी-चिंचवड शहराला मिळाला आहे. हे नाट्यसंमेलन संस्मरणीय ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा स्वागत समिती अध्यक्ष अजित पवार यांनी सोमवारी (दि.25) व्यक्त केला.

पुढील महिन्यात 6 व 7 जानेवारी 2024 ला पिंपरी-चिंचवड शहरात होत असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी आकुर्डी येथील एका हॉटेलमध्ये करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त शेखर सिंह, डॉ. पी. डी. पाटील, उद्योजक कृष्णकुमार गोयल, राजेश सांकला, आमदार अण्णा बनसोडे, मराठी नाट्य परिषदेचे शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, प्रभाकर वाघेरे, विठ्ठल काटे, शत्रुघ्न काटे, मयूर कलाटे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, संमेलनासाठी दहा कोटींचा निधी शासनाने दिला आहे. हा निधी संपूर्णपणे नाट्यसंमेलनासाठी वापरण्यात येणार नसून, महाराष्ट्रातील नाट्य परिषदेच्या शाखांना ठराविक प्रमाणात त्याचे वितरण केले जाईल. जिल्हा नियोजन समितीकडून 25 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. ते म्हणाले की, मराठी माणूस आवर्जून नाटक पाहायला नाट्यगृहात जातो. प्रत्येक शहरात नाट्यगृह उभारण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. नाटकांमधून केवळ मनोरंजनच नाही तर, समाजाचे प्रबोधनही होते. समाजाचे प्रतिबिंब नाट्यकृतीमध्ये उमटते. त्यातून प्रतिभावंत कलाकार निर्माण होतात.

शहरातील गंभीर प्रश्नांकडे लक्ष देणार

1992 ते 2017 असे 25 वर्षे आमच्याकडे महापालिकेची सत्ता होती. नागरिकांनी आम्हाला साथ दिली. शहराचा झपाट्याने विकास झाला. शहराचे रूप मिनी इंडिया झाले आहे. सध्या काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामध्ये मी लक्ष घालत आहे, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा

Back to top button