Pune Crime News : गुंड डिंगरेसह पाच साथीदारांवर मोक्का | पुढारी

Pune Crime News : गुंड डिंगरेसह पाच साथीदारांवर मोक्का

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुंड अतीश उमेश डिंगरे आणि त्याच्या पाच साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. टोळीप्रमुख अतिश उमेश डिंगरे (वय 23, रा.वणी, यवतमाळ), स्वप्निल गोवर्धन ओव्हाळ (वय 22, रा.वडगावशेरी), कुणाल महेंद्र परिहार (वय 20, रा. गणेशनगर, वडगावशेरी), आकाश हरिश्चंद्र पायगुडे (वय 22,रा. कलवडवस्ती, लोहगाव), अजय राम घनघाव (वय 23, रा.धानोरी विश्रांतवाडी),आदित्य संदेश कांबळे (वय 21,रा. वडगावशेरी) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून, आदित्य कांबळे याचा पोलिस शोध घेत आहेत.

माळवाडी वडगावशेरी परिसरात टोळक्याने ‘आम्ही भाई आहोत’, असे म्हणून वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण केली होती. याबाबत एका सुरक्षा रक्षकाने फिर्यादी दिली होती. त्यानुसार टोळक्याविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना, आरोपी डिंगरे याने आपल्या साथीदारांच्या मदतीने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली. टोळीने मागील दहा वर्षांत खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, मालमत्तेचे नुकसान करणे, दहशत निर्माण असे गंभीर गुन्हे
केले आहेत.

आरोपींवर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरदेखील त्यांच्या वर्तनात सुधारणा न होता, त्यांनी पुन्हा-पुन्हा गंभीर गुन्हे केले आहेत. त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी मोक्का कलमाचा समावेश करण्याचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्यामार्फत अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. त्यानुसार ही मोक्का कारवाई करण्यात आली आहे. रितेशकुमार यांनी चालू वर्षात तब्बल 106 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.

हेही वाचा

Back to top button