स्वयंप्रभा शैक्षणिक वाहिनीवरील कार्यक्रमांची माहिती थेट मोबाईलवर | पुढारी

स्वयंप्रभा शैक्षणिक वाहिनीवरील कार्यक्रमांची माहिती थेट मोबाईलवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या स्वयंप्रभा या शैक्षणिक वाहिनीवरील कार्यक्रमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्यात आली आहे. त्याअंतर्गत या वाहिनीवरील कार्यक्रमांची माहिती सहजगत्या उपलब्ध होण्यासाठी मोबाईलवर लघुसंदेश आणि व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) याबाबतची माहिती दिली. नॅशनल मिशन फॉर एज्युकेशन थ्रू इन्फर्मेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (एनएमईआयसीटी) या उपक्रमाच्या माध्यमातून स्वयंप्रभा ही शैक्षणिक वाहिनी सुरू करण्यात आली.

अलीकडे या वाहिन्यांची संख्या बावीसवरून चाळीसपर्यंत वाढवण्यात आली आहे. या वाहिन्यांवरील शैक्षणिक आशय यूजीसी, आयआयटी, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ अशा संस्थांकडून तयार करण्यात येतो. पदवीपूर्व ते पदव्युत्तर पदवी स्तरावरील कला, वाणिज्य, समाजशास्त्र, अभियांत्रिकी-तंत्रज्ञान, विधी, कृषी, डिझाइन अशा विविध अभ्यासक्रमांचा त्यात समावेश आहे. विद्यार्थ्यांना स्वयंप्रभा वाहिन्यांवरील शैक्षणिक कार्यक्रमांची माहिती सहजगत्या उपलब्ध होण्यासाठी लघुसंदेश, व्हॉट्सअप संदेशाची सुविधा जोडण्यात आली आहे.

ही माहिती विद्यार्थ्यांना सहजरीत्या दिली जाण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे. मर्यादित डिजिटल सेवा आणि इंटनेट सेवा असलेल्या भागात स्वयंप्रभा वाहिन्यांची माहिती पोहोचवण्याचा यूजीसीचा प्रयत्न आहे. त्यामुळे या बाबतची माहिती विद्यार्थी, शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याची सूचना यूजीसीने उच्च शिक्षण संस्थांना दिली आहे.

हेही वाचा

Back to top button