दीर्घद्वेषाचे राजकारण समाजहिताचे नाही : मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी | पुढारी

दीर्घद्वेषाचे राजकारण समाजहिताचे नाही : मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सध्याच्या राजकारणात प्रतिस्पर्ध्याला स्पर्धक न मानता शत्रू मानले जात आहे. राजकारणातील खिलाडूवृत्ती संपली आहे. मतभेदाचे रूपांतर मनभेदात होत आहे. त्यातून सुरू असलेले दीर्घद्वेषाचे राजकारण समाजहिताचे नाही, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा. ल. भोळे आणि डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ यशवंतराव दाते स्मृती संस्था आणि भोळे-सुमंत परिवाराच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

त्या वेळी प्रा. जोशी बोलत होते. मसापच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, प्रदीप दाते, किशोर बेडकिहाळ, विजया भोळे, माधुरी सुमंत आदी उपस्थित होते. डॉ. भा. ल. भोळे स्मृती वैचारिक ग्रंथ पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांना देण्यात आला. डॉ. भा. ल. भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार डॉ. मंगल खिंवसरा यांना, डॉ. यशवंत सुमंत स्मृती जीवनगौरव पुरस्कार जी. ए. उगले यांना, डॉ. यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधक प्रेरणा पुरस्कार डॉ. सूर्यकांत गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. या वेळी सतीश कामत यांच्या वतीने किशोर बेडकिहाळ यांनी, तर जी. ए. उगले यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव ऋषिकेश उगले यांनी पुरस्कार स्वीकारला.

प्रा. जोशी यांनी भारतीय लोकशाहीचे वय वाढत असताना लोकप्रतिनिधींना प्रगल्भता येणे अपेक्षित आहे. त्याची वानवा सध्या दिसत आहे, असे नमूद केले. या वेळी डॉ. पाटील यांनी डॉ. भा. ल. भोळे आणि डॉ. यशवंत सुमंत यांच्या वैचारिक कार्याचा आणि लेखनाचा आढावा घेतला. डॉ. पाटील यांनी डॉ. भोळे आणि डॉ. सुमंत यांचे कार्य खूप मोठे आहे. दोघांच्याही नावाने पुरस्कार सुरू केला, त्यामुळे दोघांच्याही विचारांचा जागर होत आहे, हे पाहून आनंद होतो, असे सांगितले.

आज सुशिक्षित असलेला मध्यमवर्ग गप्प बसला आहे. हाच मध्यमवर्ग बोलला नाही तर त्याला पुन्हा कधीच बोलण्याची संधी मिळणार नाही. तरुण-तरुणींनी रस्त्यावर येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला शिकले पाहिजे.

– डॉ. मंगल खिंवसरा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या

हेही वाचा

 

Back to top button