

जम्मू ः जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्कराने पूूर्ण ताकदीने दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. दुसरीकडे, 'एनआयए'ची एक टीम घटनास्थळी पोहोचली असून, ती तपासात सहभागी झाली आहे. दरम्यान, पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, तिची पाळेमुळे खणून काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, या दहशतवाद्यांनी हल्ल्यात 'एम-4' या घातक अमेरिकी मशिनगन वापरल्याचे समोर आल्याने सारेच अलर्ट मोडवर आले आहेत.
पुंछमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये बुधवारी रात्रीपासून चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्करी वाहनातून अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली होती. बुफलियाज येथून मिनी ट्रक आणि जिप्सीमधून जवान पुंछकडे जात असताना गुरुवारी दुपारी टोपा पीर या ठिकाणी दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. जवानांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांविरोधात लढताना या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पूर्ण ताकदीने या दहशतवाद्यांच्या मागावर असून, यासाठी शेकडो जवानांच्या अतिरिक्त तुकड्या, शिकारी कुत्रे, ड्रोन व सशस्त्र हेलिकॉप्टर्स यांच्या मदतीने सारा जंगल परिसर पिंजून काढणे सुरू केले आहे. या भागांतून जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले असून, आसपासच्या परिसरातील प्रत्येक घर तपासले जात आहे.
हल्ल्याची जबाबदारी पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट अर्थात 'पीएएफएफ' या संघटनेने स्वीकारली आहे. या संघटनेने सोशल मीडियावर हल्ल्याच्या ठिकाणचे छायाचित्र पोस्ट करीत जबाबदारी स्वीकारली. या छायाचित्रात एक अमेरिकन बनावटीची 'एम-4' मशिनगनही दिसत आहे. ही अत्यंत घातक मशिनगन असून, अमेरिकी सैन्यदलात तिचा 1980 पासून वापर केला जातो. याआधीही काश्मिरी दहशवाद्यांकडे या मशिनगन असल्याचे सांगितले जात होते.
2019 मध्ये 370 कलम हटवण्यात आल्यानंतर पाकिस्तानच्या 'आयएसआय'ने 'जैश-ए-मोहम्मद'च्या साथीने पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट ही संघटना स्थापन केल्याचे गुप्तचर संस्था सांगतात. पाकिस्तानात बसून भारतातील हल्ल्यांचे नियोजन झाल्यावर स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने व पेड एजंटांच्या मदतीने हल्ले चढवण्याची या संघटनेची पद्धत आहे.
लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, 7 ते 10 दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असावा, असा कयास आहे. या हल्ल्यामागे गेल्या दीड वर्षापासून अॅक्टिव्ह असलेल्या दहशतवादी संघटना असाव्यात. सध्या या दहशतवाद्यांच्या मदतीला पाकिस्तानी लष्करातील माजी जवान व अधिकारी आल्याने या हल्ल्यांची तीव्रता वाढत आहे. ऑक्टोबर महिन्यात दहशतवाद्यांच्या एका टोळीचा सफाया करताना त्यामुळेच 20 दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागला होता. त्या मोहिमेत लष्कराचे 9 जवान शहीद झाले होते.