साडेतीन वर्षानंतर उलगडले महिलेच्या खूनाचे गुढ | पुढारी

साडेतीन वर्षानंतर उलगडले महिलेच्या खूनाचे गुढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तळजाई जंगलात सापडलेल्या महिलेल्या मृतदेहाच्या खूनाचा छडा लावण्यात तब्बल साडेतीन वर्षानंतर पर्वती पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका आरोपीला पर्वती पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या महिलेचा मृतदेह करोनाच्या काळात ऑगस्ट 2020  मध्ये बेवारस अवस्थेत सापडला होता. तर वैद्यकीय अहवाल सात डिसेंबर 2023 रोजी प्राप्त झाल्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघड झाले आहे. सागर दादाहरी साठे ( 26 रा. सुतारदरा, कोथरुड ) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार करोना काळात नागरिकांना बाहेर पडण्यास बंदी असल्याने तळजाई परिसरातही नागरिक फिरायला येत नव्हते. दरम्यान 17 ऑगस्ट 2020 तळजाई जंगलात गेलेल्या निखील माने (19 , रा. पर्वती) याने पोलीस ठाण्यात येवून कळविले की, पर्वती टेकडीच्या वरील बाजूस जंगलामध्ये पडक्या पाण्याच्या टाकीजवळ तळजाई टेकडीकडे जाण्या-या रस्त्याच्या खालच्या बाजूस एका महिलेचा मृतदेह दिसत आहे. तसेच तो मृतदेह कुजलेला असून त्या ठिकाणी दुर्गंधी येत आहे. खबर मिळताच त्याठिकाणी तात्कालीन पोलीस पथक रवाना झाले. पोलीसांनी तात्काळ दखल घेवून अकस्मात मयत दाखल करून तपास सुरु केला. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यावर मृत महिलेचा मृत्यू चेह-यावर व छातीवर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले होते.

याप्रकरणी पोलीसांनी अकस्मात मयत दाखल करुन तपास सुरु ठेवला होता. परंतू महिलेची ओळख त्यांना पटू शकली नाही. दरम्यान वैद्यकीय अंतिम अहवाल आल्यावर दिनांक सात डिसेंबर 2023 रोजी पर्वती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याचा तपास सुरु करण्यात आला. त्यानंतर पर्वती पोलीसांची चार पथके तयार करुन संपूर्ण महाराष्ट्रातील मिसिंग महिलांचे रेकॉर्ड अत्यंत बारकाईने तसेच प्रत्यक्ष जावून शहर तसेच ग्रामीण हद्दीतील पोलीस स्टेशन्स येथे तपासण्यात आले. दरम्यान या वर्णनाची महिला हि दिनांक 12 ऑगस्ट रोजी घरातून निघून गेली व परत आली नाही म्हणून रोहन संतोप चव्हाण यांनी राजगड पोलीस ठाणे अंकित खेड-शिवापूर पोलीस आऊटपोस्ट येथे मिसींग तक्रार दाखल केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व बातमीदारांच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारचा तांत्रिक पुरावा उपलब्ध नसताना पारंपारिक पध्दतीने तपास करुन सागर साठेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करता त्याने त्याची विवाहित प्रेयसी रेखा संतोष चव्हाण ( 36 रा. वेताळनगर, शिवापूरवाडा ) हिचा तत्कालीन वादातून व पैशासाठी खून केल्याचे कबूल केले.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक विजय खोमणे, उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलीस अंमलदार राजू जाधव, कुंदन शिंदे, नवनाथ भोसले, प्रशांत शिंदे, दयानंद तेलंगे, अंनिस तांबोळी, अमित सुर्वे, सद्याम शेख, ज्ञानेश्वर शिंदे, सुर्या जाधव यांनी केलेली आहे.

हेही वाचा :

Back to top button