पीएमपीच चाललंय काय? सात दिवसांत 324 बस ब्रेकडाऊन

पीएमपीच चाललंय काय? सात दिवसांत 324 बस ब्रेकडाऊन
Published on
Updated on
पुणे :  पुढारी वृत्तसेवा : कार्यालयीन कामाला, शाळा, महाविद्यालयांमध्ये जाण्याची गडबड… महत्त्वाची मीटिंग अन् रस्त्यातच पीएमपीची बस बंद पडली… ही गोष्ट आठवड्याची नव्हे तर आता रोजचीच झाली असून, यामुळे पुणेकर प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होत आहे. परिणामी, पिकअवर्समध्ये होणार्‍या वाहतूक कोंडीचा त्रास इतर वाहनचालकांना, तर रस्त्यात बस पडल्याने बस बदलण्याची कसरत प्रवाशांना करावी लागत आहे. यावर ठोस उपाययोजना कधी होणार, असा सवाल पुणेकर प्रवाशांकडून पीएमपी प्रशासनाला विचारला जात आहे.
पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 119 बस गाड्या आहेत. त्यापैकी काही ठेकेदारांच्या तर काही स्व:मालकीच्या आहेत. 2 हजार 119 बसपैकी दररोज 1600 ते 1700 च्या घरात बस मार्गावर असतात. उर्वरित 300 बस देखभाल दुरुस्ती, ब्रेकडाऊन यांसारख्या  कारणांमुळे आगारांमध्ये उभ्या असतात.  परिणामी, पुणेकर प्रवाशांना पुरेशा बस मिळत नाहीत. शहराची लोकसंख्या पाहता 3 हजार 500 बस दररोज मार्गावर हव्या आहेत.
मात्र, त्याच्या निम्म्याही बस मार्गावर नसतात. त्यातच आता पीएमआरडीए भागात बससेवा पुरवावी लागते. त्यामुळे शहरातील बससंख्या आपोआपच कमी होत आहे. प्रवासासाठी पुणेकरांना पर्यायी वाहनांचा वापर करावा लागत आहे. यामुळे शहरात विविध समस्या निर्माण होत आहेत.

पीएमपी अध्यक्षांनी लक्ष द्यावे

मागील आठवड्यात दि. 11 ते 17 डिसेंबर 2023 या सात दिवसांच्या कालावधीत 324 बस रस्त्यातच ब्रेकडाऊन (रस्त्यात बस बंद पडणे) झाल्याची नोंद पीएमपी प्रशासनाने केली आहे. यात पीएमपीच्या स्व:मालकीच्या 142 तर भाडेतत्त्वावरील ठेकेदारांच्या 182 बस अशा एकूण 324 बस ब्रेकडाऊन झाल्या आहेत. यात सर्वाधिक ब्रेकडाऊन ठेकेदारांच्याच बस आहेत. त्यामुळे पीएमपी अध्यक्ष संजय कोलते यांनी स्वत:च्या देखभाल दुरुस्ती विभागासह ठेकेदारांच्या देखभाल दुरुस्ती विभागाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
सात दिवसांतील उलाढाल
  • सात दिवसांत मिळालेले उत्पन्न : 12,15,88,742
  • प्रवासीसंख्या : 89,98,561
  • बसच्या फेर्‍या : 1,30,328
  • ब्रेकडाऊन बससंख्या : 324

मागच्या महिन्यात 1363 बस ब्रेकडाऊन

मागील महिन्यात दि. 1 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत पीएमपीच्या ताफ्यातील 1 हजार 363 बस ब्रेकडाऊन झाल्या होत्या. त्यात 587 बस स्व:मालकीच्या, तर 776 बस ठेकेदारांच्या होत्या. त्या वेळी देखील ठेकेदारांच्याच बसची ब्रेकडाऊन संख्या सर्वाधिक होती. दर महिन्याला अशीच स्थिती असते. यावर अद्याप पीएमपीकडील अधिकारी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यास यशस्वी झालेले नाहीत. त्यामुळे नुकताच पीएमपीचा पदभार स्वीकारलेले पीएमपी अध्यक्ष संजय कोलते आणि सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यावर ठोस उपाययोजना करण्यात यशस्वी होणार का? हे पाहावे लागणार आहे.
मला कामानिमित्त दररोज पीएमपी बसच्या माध्यमातून प्रवास करावा लागतो. अनेकदा बसगाड्या रस्त्यातच बंद पडतात. परिणामी, आमची महत्त्वाची कामे वेळेत होत नाही. बस बदलायची कसरत असते, तर त्या ठिकाणी दुसरी येण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागते.
– अजय रणपिसे, प्रवासी
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news