पणजी : ‘झुआरी’ जोडपुलाचे आज लोकार्पण | पुढारी

पणजी : ‘झुआरी’ जोडपुलाचे आज लोकार्पण

पणजी; पुढारी वृत्तसेवा : झुआरी नदीवर बांधलेल्या नव्या जोडपुलाचे उद्घाटन शुक्रवार, दि.22 रोजी केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संध्या. 5.30 वा. होणार आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह इतर मंत्री व आमदार उपस्थित राहणार आहेत. याचवेळी झुआरी पुलांच्या मध्ये 270 कोटी खर्च करून बांधण्यात येणार्‍या दुहेरी टॉवरची पायाभरणी केली जाणार आहे. वर्षभरापूर्वी झुआरीवरील पहिल्या पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आता दुसर्‍या जोडपुलाचे उद्घाटन शुक्रवारी होत आहे.

उत्तर व दक्षिण गोव्याला जोडणारा जुना झुुआरी पूल कमकुवत झाल्यानंतर तो अवजड वाहनांसाठी बंद ठेऊन हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवला होता. आता प्रत्येकी चौपदरी दोन पूल झुआरीवर तयार झाल्याने उत्तर व दक्षिण गोव्याकडे ये-जा करणार्‍या वाहनांना दिलासा मिळणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर 24 डिसेंबर रोजी दुसरा पूल वाहतुकीला खुला केला जाणार आहे. याचवेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते दोन्ही पुलांच्या मधोमध 270 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार्‍या दुहेरी टॉवरची पायाभरणीही केली जाणार आहे. तसेच उद्या दि.22 रोजीच गडकरी यांच्या हस्ते पुंडलिक नगर ते गिरी या पर्वरीतील राष्ट्रीय हमरस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बांधण्यात येणार्‍या 641 कोटी खर्चाच्या सहापदरी उड्डाणपुलाची पायाभरणी होणार आहे.

नव्या पुलावर 1500 कोटी खर्च

झुुआरीवरील नवीन आठ-लेन-केबल-स्टेड पूल सुमारे 1,500 कोटी रुपये खर्चून बांधला गेला आहे. जो संपूर्णपणे केंद्राने निधी दिला आहे. या पुलाचे बांधकामही दिलीप बिल्ड-कॉनने केले असून वरचे दोन टॉवर बांधण्यासाठी पूल बांधताना आधीच तरतूद करण्यात आली आहे.

टॉवर्सची उंची 110 मीटर

झुआरी पुलांच्यामध्ये बांधण्यात येणार्‍या दोन्ही टॉवर्सची उंची अंदाजे 110 मीटर असण्याची अपेक्षा आहे आणि प्रत्येकाच्या वर एक गॅलरी असेल. प्रत्येक गॅलरीत एकावेळी 500 लोक राहू शकतील. नितीन गडकरी यांनी आयफेल टॉवरच्या धर्तीवर येथील टॉवर्सची कल्पना केली होती. हे टॉवर जागतिक दर्जाचे पर्यटकांचे आकर्षण ठरेल, अशी गडकरींची अपेक्षा आहे. टॉवर्सचे डिझाईन अजून निश्चित झालेले नाही.

Back to top button