खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : अनेक वर्षांपासून रखडलेल्या धायरी-सिंहगड रस्ता परिसरातील तीन डीपी रस्त्यांच्या जागेची पाहणी आज पथ विभागाने केली. डीपी रस्त्यांसाठी आम आदमी पक्षाच्या वतीने अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. 'धायरीत डीपी रस्त्यावर अतिक्रमणांचा धोका' असे वृत्त दैनिक 'पुढारी'मध्ये 15 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाले होते. या परिसरात प्रचंड प्रमाणात लोकसंख्या, वाहतूक वाढली आहे. पर्यायी रस्त्यांअभावी नागरिकांचे हाल होत आहेत.
त्याची दखल घेत पथ विभागाने या रस्त्यांच्या जागेची पाहणी केली. आम आदमी पक्षाचे शहर प्रवक्ते धनंजय बेनकर, प्रदेश संघटनमंत्री अजित फाटके, शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, महिला अध्यक्षा सुरेखा भोसले, महासचिव सतीश यादव,अक्षय शिंदे यांच्यासमवेत पथ विभागाचे शाखा अभियंता संदेश पाटील यांनी पाहणी केली.
हायवेजवळ असल्याने या परिसरात शैक्षणिक संस्था, कंपन्या, नागरी वस्त्यांचे मोठे जाळे पसरले आहे. डीपी रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी दूर होणार आहे.
तीनपैकी एकच रस्ता डीपी आराखड्यात आहे. दोन रस्ते पीएम आरडीएच्या आराखड्यात आहेत. हा सर्व परिसर पालिकेत असल्याने पालिका प्रशासनाने तिन्ही रस्त्यांच्या कामांना गती द्यावी. पुरेशा रस्त्यांअभावी वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे.
– धनंजय बेनकर, शहर प्रवक्ते, आम आदमी पक्ष.
धायरी येथील बेनकरमळा रस्ता, चव्हाण बंगला ते ड्रेन कंपनी रस्ता व हायब्लिज सोसायटी ते लक्ष्मी लॉज रस्ता या प्रस्तावित तिन्ही रस्त्यांच्या जागांची पाहणी करण्यात आली. धायरी येथील सावित्री गार्डन ते सिंहगड रस्ता या डीपी रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्याबरोबर धायरी येथील तिन्ही रस्ते करण्यात यावेत अन्यथा या रस्त्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. याकडे आम आदमी पक्षाचे (आप) शहर प्रवक्ते धनंजय बेनकर यांच्यासह नागरिक प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. प्रास्ताविक रस्त्यांवर अतिक्रमणे होणार नाहीत यासाठी पथ विभागाने प्राथमिक कार्यवाही सुरू केली आहे.