वैद्यकीय प्रवेश तर दूर, 22 लाख घेऊन दिली जिवे मारण्याची धमकी | पुढारी

वैद्यकीय प्रवेश तर दूर, 22 लाख घेऊन दिली जिवे मारण्याची धमकी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील नामांकित वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने तिघांना 22 लाख 10 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. बीएएमएस या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगून बनावट अलॉटमेंट पत्र देऊन ही फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सौरभ सुनील कोडग (वय 22,रा. जमीलनगर वेस्ट, मुंबई), संतोष काशीनाथ पवार (वय 50,रा. विरार ईस्ट, मुंबई) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ओंकार चंद्रकांत पवार (वय 20, रा.वेल्हे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी तरुणाचा विश्वास संपादन करून, त्याला धनकवडी येथील एका नामांकित कॉलेजमध्ये बीएएमएस या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देतो असे सांगितले.

फिर्यादी तरुण हा वैद्यकीय प्रवेशाचे क्लासेस करत असताना एका मित्राच्या माध्यमातून त्याचा आरोपींसोबत परिचय झाला होता. त्यावेळी दोघांनी सुरुवातीला तरुणाकडून तीन लाख रुपये आरटीजीएसद्वारे घेतले. त्यानंतर प्रवेश झाल्याचे सांगून बनावट अलॉटमेंट लेटर तरुणाला देऊन त्याच्याकडून 10 लाख 20 हजार रुपये घेतले. संबंधित शैक्षणिक संस्थेशी आरोपींचा कोणताही कायदेशीर संबंध नसताना त्यांनी प्रवेशाच्या नावाने पैसे घेतले. तसेच आरोपींनी इतर दोघांकडूनदेखील असे पैसे घेऊन फसवणूक केली आहे.

सयाजी मोहिते यांच्या मुलाला, तर रूपाली काळे यांच्या मुलीला हडपसर येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो म्हणून अनुक्रमे सात आणि एक लाख 90 हजार रुपये घेतले. विश्वास वाटावा म्हणून आरोपींनी त्यांना बनावट बिल पावत्या दिल्या. दरम्यान, फिर्यादी आणि इतरांना फसवणूक झाल्याचे लक्षात आरोपींकडे पैशांची मागणी केल्यानंतर त्यांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button