वर्ल्ड बुक फेअरची पुण्यात क्षमता : मिलिंद मराठे

वर्ल्ड बुक फेअरची पुण्यात क्षमता : मिलिंद मराठे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे पुस्तक महोत्सवाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पुण्यामध्ये दिल्लीत होणार्‍या वर्ल्ड बुक फेअरशी स्पर्धा करण्याची क्षमता आहे, असे मत राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी मांडले. देशात पहिल्यांदाच पुस्तकांच्या प्रचारासाठीचे धोरण राष्ट्रीय पुस्तक न्यास तयार करत असून, लवकरच हे धोरण जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या अनुषंगाने मिलिंद मराठे यांनी संवाद साधला. पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, माधव भंडारी, अ‍ॅड. मंदार जोशी या वेळी उपस्थित होते.
मराठे म्हणाले, प्रदर्शनातील पुस्तक संपल्याने सहभागी प्रकाशकांना दोन वेळा पुस्तके आणावी लागली आहेत. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवाला मिळत असलेला प्रतिसाद फार चांगला आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे यंदा उज्जैन, शिलाँग, लडाख, गोमती येथे पुस्तक महोत्सव झाला. तर संबलपूर, दिल्ली येथे पुस्तक महोत्सव होणार आहे. कर्नाटक, जम्मू काश्मीर येथेही पुस्तक महोत्सव आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आतापर्यंत झालेल्या पुस्तक महोत्सवांच्या तुलनेत पुण्यातील महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद प्रचंड मोठा आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या पुस्तकांची विक्रमी विक्री झाली आहे. पुण्याखालोखाल उज्जैन, शिलाँग येथेही चांगली विक्री झाली. सीमावर्ती राज्यातही महोत्सव आयोजित करत आहोत. कोरोनानंतर पुस्तकांचे वाचनाचे प्रमाण वाढले. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा विद्यार्थी-पालकांना कळल्या. त्यामुळे विशेषतः लहान मुलांच्या पुस्तकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. ही वाढ 30 ते 35 टक्क्यांपर्यंत आहे. त्यात अ‍ॅक्टिव्हिटी बुक, अवांतर वाचनासाठी गोष्टींच्या पुस्तकांना मागणी असल्याचे निरीक्षण मराठे यांनी नोंदवले.

पुस्तक प्रचार धोरण

2011मध्ये पुस्तक प्रचार धोरण तयार करण्यात आले होते. त्याचे पुढे काही झाले नव्हते. पण आता नव्याने धोरण तयार करण्यात येत आहे. 30 कोटी विद्यार्थ्यांनी किमान दोन पुस्तके वाचल्यास 60 कोटी पुस्तके वाचली जातील. तसेच केंद्राच्या योजनेनुसार गाव तिथे ग्रंथालय झाल्यास मोठ्या प्रमाणात पुस्तके लागणार आहेत. त्या अनुषंगाने पुस्तक प्रचार धोरण महत्त्वाचे ठरणार असल्याचे मराठे यांनी सांगितले.

प्रकाशन अभ्यासक्रम

प्रकाशनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण आतापर्यंत उपलब्ध नव्हते. प्रकाशनामध्ये आशय कळणे, पुस्तकांच्या निवडीसह आर्थिक व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन अशा अनेक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे ऑनलाइन अभ्यासक्रम राबवण्यात येत आहे. या अभ्यासक्रमातील सहभागींना प्रत्यक्ष अनुभवासाठी एक महिन्याची इंटर्नशिपही उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता प्रकाशनाचा अभ्यासक्रम विद्यापीठांच्या साहाय्याने राबवण्याचा मानस आहे, असे मराठे म्हणाले.

डिजिटलची निर्मिती

सध्या राष्ट्रीय पुस्तक न्यास छापील पुस्तके तयार करते. मात्र डिजिटल माध्यमालाही असलेली मागणी लक्षात घेऊन येत्या काळात ऑडिओ-व्हिडिओ पुस्तकांची निर्मितीही राष्ट्रीय पुस्तक न्यासकडून करण्यात येणार आहे. त्यानुसार दिल्ली येथे होणार्‍या वर्ल्ड बुक फेअरपर्यंत पाच ऑडिओ-व्हिडिओ पुस्तके तयार करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती मराठे यांनी दिली.

महोत्सवात आज काय

  •  सकाळी 10.30 वाजता : चारुहास पंडित यांची व्यंगचित्रांवर कार्यशाळा.
  • दुपारी 1.30 वाजता : ग्रंथपाल परिसंवाद.
  •  दुपारी 1.30 वाजपासून : टॅलेंट हंट.
  •  सायंकाळी 5 वाजता : वाचन संस्कृतीतील माध्यमांचे योगदान' हा वृत्तपत्रांच्या संपादकांचा परिसंवाद. सहभाग : मुकुंद संगोराम, श्रीधर लोणी, सुनील माळी, सम्राट फडणीस, किरण शेलार.
  •  सायंकाळी 5 : टॅलेंट हंट ग्रुप सादरीकरण.
  • सायंकाळी 6 : चौथ्या विश्वविक्रमाची घोषणा.
  •  सायं. 6.30 वा. : पुणे नगर वाचन मंदिर, पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकार्‍यांचा प्रातिनिधिक सत्कार.
  •  सायंकाळी 7.30 वा. : फैजल बँडचे (लडाख) सादरीकरण.

दीड लाख नागरिकांची भेट

पुणे पुस्तक महोत्सवाला आतापर्यंत दीड लाख नागरिकांनी भेट दिली असून, यामध्ये शालेय विद्यार्थी आणि युवकांची संख्या लक्षणीय आहे. प्रकाशकांनादेखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे आणि महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी बुधवारी दिली. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, भाजप नेते माधव भांडारी आदी यावेळी उपस्थित होते. पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. पांडे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर, साधारण दीड लाख नागरिकांनी भेट दिली आहे. येत्या काही दिवसात हा आकडा वाढणार आहे. शनिवारी आणि रविवारी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रदर्शन रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवात 28 हजार शालेय विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. हे विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांवर असणारी पुस्तके आवर्जून पाहत आहेत. त्याचप्रमाणे महाराजांवरील माहिती प्रदर्शनालाही भेट देत आहेत.

पुणे शहरात पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन होणे ही अत्यंत चांगली बाब आहे. या निमित्ताने लोकांना विविध प्रकाराची पुस्तके खरेदी करण्याची संधी मिळते. या महोत्सवाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवाचे आयोजन करणार्‍या राजेश पांडे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करायला हवे. असे उपक्रम यापुढील काळातही पुणे शहरात व्हायला हवेत.

– डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ साहित्यिक

'किशोर'चे स्मरणरंजन

बालभारतीचे 'किशोर' मासिक हे राज्यभरात लोकप्रिय आहे. गेल्या पाच दशकांचा समृद्ध वारसा असलेल्या 'किशोर' मासिकच्या गेल्या पन्नास वर्षांतील मुखपृष्ठांचे प्रदर्शन पुणे पुस्तक महोत्सवात भरवण्यात आले आहेत. महोत्सवाला भेट देणारे पुणेकर हे प्रदर्शन पाहून स्मरणरंजनात दंग होत आहेत. राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे 'पुणे पुस्तक महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. विविध भाषांतील पुस्तकांची दोनशेहून अधिक दालने या महोत्सवात आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच 'किशोर'च्या मुखपृष्ठांचे प्रदर्शन भरवण्यात आले असल्याने पुणेकरांना येता-जाता हे प्रदर्शन पाहण्याची संधी मिळत आहे.

त्यामुळे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या बालपणीच्या 'किशोर'च्या आठवणींमध्ये रमत आहेत, तर पालक त्यांच्या मुलांना 'किशोर'चे प्रदर्शन दाखवून त्यांच्या वाचनाच्या आठवणी सांगताना दिसत आहेत. 'किशोर' मासिकाच्या मुखपृष्ठाच्या प्रदर्शनाविषयी 'किशोर'चे संपादक किरण केंद्रे म्हणाले, 'किशोर' मासिकाचे सध्या 52 वे वर्ष सुरू आहे. या मासिकासाठी आजवर अनेक मान्यवर चित्रकारांनी योगदान दिले आहे. महोत्सवात 'किशोर'च्या गाजलेल्या 50 मुखपृष्ठांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news