Pro Kabaddi League : जयपूर पिंक पँथर्सचा यूपी योद्धाजवर विजय

Pro Kabaddi League : जयपूर पिंक पँथर्सचा यूपी योद्धाजवर विजय
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत अव्वल खेळाडू अर्जुन देशवालला अखेर सूर गवसल्यामुळे सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्स संघाने यूपी योद्धाज संघावर 41-24 असा विजय मिळवताना आपले आव्हान कायम राखले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या लढतीत अर्जुन देशवालने 13 गुण मिळवताना विजयात मोलाचा वाटा उचललाच आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांनाही इशारा दिला.

दोन्ही संघांनी सावध प्रारंभ केल्यानंतर 10 व्या मिनिटाला पँथर्सकडे 6-5 अशी निसटती आघाडी होती. मात्र, सूर गवसलेल्या अर्जुनने योद्धाजवर जोरदार आक्रमण केले. पाठोपाठ पँथर्सचा कर्णधार सुनिल कुमारने विजय मलिकची अप्रतिम पकड करताना चौदाव्या मिनिटाला योद्धाजवर पहिला लोन चढवला. या वेळी पँथर्सकडे 11-6 अशी आघाडी होती. अर्जुनने त्यांनतर चार चढायांमध्ये चार गडी बाद करताना पँथर्सचे वर्चस्व कायम राखले. पाठोपाठ काही उत्कृष्ट पकडींमुळे पँथर्सने योद्धाजवर केवळ चारच मिनिटांत दुसरा लोन चढविला. या वेळी पँथर्सकडे 20-7 अशी आघाडी होती.

मध्यांतराला 24-9 अशी आघाडी घेणार्‍या पँथर्सने विजयाची तेव्हाच निश्चिती केली होती. याचवेळी सूर गवसलेल्या योद्धाजच्या खेळाडूंनी मध्यांतरानंतर जोरदार प्रयत्न केला. गुरदीपने केलेल्या दोन पकडी आणि प्रदीप नरवालने केलेल्या चढाया यामुळे पँथर्स वर पहिला लोन चढवताना योद्धाजने आपली पिछाडी 20-28 अशी कमी केली. बचावात सुधारणा करणार्‍या योद्धाजसाठीही आठ गुणांची पिछाडी भरून काढणे अवघड बनले होते. अर्जुनने अखेरच्या मिनिटाला सुपर रेड करताना योद्धाजवर तिसरा लोन चढविला. त्यामुळे पँथर्सने हा सामना 41-24 असा 17 गुणांच्या फरकाने जिंकला. या मौसमातील हा जयपूर पिंक पँथर्सचा तिसरा विजय ठरला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news