Pune News : वादग्रस्त होर्डिंग वाचवण्यासाठी प्रशासनाचीच धडपड | पुढारी

Pune News : वादग्रस्त होर्डिंग वाचवण्यासाठी प्रशासनाचीच धडपड

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नियमांना तिलांजली देऊन टिळक चौकातील संभाजी पोलिस चौकीच्या मागे उभारण्यात आलेले  होर्डिंग वाचवण्यासाठी महापालिका प्रशासनाची धडपड सुरू आहे. महापालिकेच्या जागेवर नदीपात्रालगत उभारलेल्या या होर्डिंगवर कारवाई करायची सोडून होर्डिंग व्यावसायिकाला सदर जागा 11 महिन्यांच्या कराराने भाड्याने देण्याचा प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयाने तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संभाजी पोलिस चौकीच्यामागे तीन होर्डिंग एकत्र करून एकच मोठे होर्डिंग उभारण्यात आले होते. यासंदर्भात दैनिक ’पुढारी’ने वृत्त दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने या होर्डिंगवर जाहिरात प्रसिद्ध करण्यास बंदी घालून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशीमध्ये हे होर्डिंग उभे करताना दोन होर्डिंगमध्ये प्रत्येकी एक मीटरचे अंतर न सोडणे, राडारोडा टाकणे, झाडे तोडणे असे प्रकार उजेडात आले. या प्रकरणात कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील तीन कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले. याच काळात होर्डिंग व्यावसायिकाने सलग होर्डिंग वेगवेगळे करून तीन होर्डिंग केले.
दरम्यान, होर्डिंग उभारलेली ही जागा खासगी मालकीची असल्याचा दावा होर्डिंग व्यावसायिकाने केला होता. मात्र, महापालिकेच्या तपासणीमध्ये ही जागा महापालिकेच्या मालकीची असल्याचे समोर आले. तरीही क्षेत्रीय कार्यालयाने किंवा महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने या होर्डिंगवर आजवर कारवाई केली नाही. त्यानंतर आता होर्डिंगची जागा संबंधित होर्डिंग व्यावसायिकास 11 महिने मुदतीने भाड्याने देण्याचा प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयाने तयार केला असून, तो आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्याच्या हालचाल सुरू झाल्या आहेत.

विहित निविदा नाहीच

महापालिकेची जागा भाड्याने देताना जागा वाटप नियमावलीनुसार लिलाव करणे आवश्यक आहे. जो निविदाधारक जास्त भाडे महापालिकेला देईल त्यास जागा देणे आवश्यक आहे. पण या प्रक्रियेलाही फाटा देऊन होर्डिंग व्यावसायिकाच्या फायद्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू असल्याचे समोर आले आहे.
आमच्याकडे अद्याप होर्डिंगसंदर्भात प्रस्ताव आलेला नाही. सर्व गोष्टी नियमात बसल्याशिवाय होर्डिंगला परवानगी दिली जाणार नाही.
– डॉ. कुणाल खेमनार,  अतिरिक्त आयुक्त, महापालिका. 
हेही वाचा

Back to top button