

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गाडीला कट मारल्याचा बहाणा करत एका युवकाला पाच जणांच्या टोळक्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत डोक्यात कोयत्याने वार केले. त्यानंतर परिसरात राडा घालत दहशत निर्माण केली. याप्रकरणी, घोरपडी गाव येथील सोळा वर्षीय युवकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शोएब समीर शेख (वय 19), प्रतीक कैलास इलिहिणार (वय 20) या दोघांना ताब्यात घेतले असून, त्याच्या इतर तिघा साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 14 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास वेताळनगर (आंबेगाव बुद्रुक) परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवक हा त्याच्या एका मित्रासोबत दुचाकीवरून मित्राकडे जेवण करण्यासाठी निघाला होता. त्या वेळी त्याच्या तोंड ओळखीचे असलेल्या आरोपींनी दुचाकीवरून युवकाच्या गाडीसमोर येऊन कट मारल्याचा बहाणा करत त्याच्यासोबत वाद करण्यास सुरुवात केली. आरोपींनी युवकाला शिवीगाळ करत त्यांच्याकडील कोयत्याने डोक्यात वार केले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. परिसरात हातातील कोयते हवेत फिरवून आरडा-ओरडा करून शिवीगाळ करत दहशत निर्माण केली. हा प्रकार घडल्यानंतर युवकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील करीत आहेत.
हेही वाचा