Pimpri Crime News : परस्पर कर्ज काढणार्‍या ठगाला केली अटक | पुढारी

Pimpri Crime News : परस्पर कर्ज काढणार्‍या ठगाला केली अटक

पिंपरी : मोबाईल खरेदीसाठी कर्ज करून देतो, असे सांगून ग्राहकाकडून कागदपत्रे घेतली. तसेच, बनावट सही करून ग्राहकाच्या नावाने बँकेतून 49 हजार 938 रुपयांचे परस्पर कर्ज काढले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. पुनावळे येथील साईसिद्धी मोबाईल सेंटर येथे 14 ते 15 जुलै 2023 या कालावधीत हा प्रकार घडला. सिकंदर श्रावण भालेराव (43, रा. पुनावळे) यांनी या प्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, शरद बाळू जाधव, यास अटक करण्यात आले आहे.

शरद जाधव हा बँकेचा एक्झिकेटिव्ह म्हणून काम करतो. ग्राहकांना मोबाईल घेण्यासाठी शरद जाधव बँकेकडून कर्ज मिळवून देतो. दरम्यान, पुनावळे येथील साई सिद्धी मोबाईल सेंटर येथे फिर्यादी भालेराव मोबाईल घेण्यासाठी आले. मोबाईलसाठी कर्ज होईल का, असे त्यांनी विचारले. मी कर्ज मिळवून देतो, असे जाधव याने सांगितले. त्याने भालेराव यांची कागदपत्रे घेऊन कर्जासाठीची प्रक्रिया केली. मात्र, कर्ज मिळण्यात अडचण आहे, असे सांगत त्याने भालेराव यांना बँकेचे कर्ज मिळवून दिले नाही. त्यानंतर भालेराव यांनी दुसर्‍या बँकेचे कर्ज करून मोबाईल खरेदी केला.

दरम्यान, डिसेंबर 2023 मध्ये त्यांना बँकेतून फोन आला की, तुम्ही गेली सहा महिने मोबाईल लोनचे हप्ते भरले नाही. त्या वेळी चौकशी केली असता आपल्या नावावर जुलै महिन्यात 49 हजार 938 रुपयांचे कर्ज काढल्याचे भालेराव यांना समजले. तसेच, ही रक्कम व्याजासह 55 हजार 229 एवढी झाली असल्याचेही त्यांना बँकेने सांगितले.

हेही वाचा

Back to top button