सनसिटी डीपी रस्त्याचे काम रखडले; मोबदल्याचा प्रश्नही अद्याप प्रलंबित | पुढारी

सनसिटी डीपी रस्त्याचे काम रखडले; मोबदल्याचा प्रश्नही अद्याप प्रलंबित

मिलींद पानसरे

धायरी : पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेला सनसिटी रस्ता ते इंडियन ह्युम पाईप कंपनी दरम्यानच्या शंभर फुटी डीपी रस्त्याचे काम रखडले आहे. महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात तीस मीटरऐवजी नऊ मीटर डांबरी रस्ता तयार केला आहे. मात्र, विविध समस्यांमुळे हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे प्रशासनास अवघड होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
या रस्त्यामध्ये सिंहगड रस्त्याला लागून महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर आहे. तसेच जागामालकांनी हा रस्ता करण्यासाठी तोंडी सहमती दिली आहे. महापालिका प्रशासन त्यांना एफएसआय, टीडीआर स्वरूपात जागेचा मोबदला देणार आहे.

परंतु, याबाबत जागामालकांनी अद्यापही कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. जागामालकांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यावर तातडने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पथ विभागाचे कार्यकारी अभियंता अमर शिंदे यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाची सर्व वाहने या रस्त्याचा वापर करीत आहेत. मात्र, सार्वजनिक वाहतुकीसाठी हा रस्ता अद्यापही खुला करण्यात आलेला नाही. सनसिटी रस्ता सुरू होतो, त्या ठिकाणी लोखंडी गेट लावून जागामालकांनी हा मार्ग बंद करून ठेवला आहे. त्यामुळे हा रस्ता सार्वजनिक वाहतुकीला खुले करणे पालिका प्रशासनास अवघड होऊन बसले आहे.

रस्ता खुला करण्यासाठी लवकरच बैठक

या रस्त्यासाठी जागामालकांचे चांगले सहकार्य लाभले आहे. रस्त्यात येणारा ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्यासाठी महावितरण कंपनीशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, हा रस्ता जागामालकांनी गेट लावून बंद केला आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी महापालिका आयुक्त कार्यालयात येत्या 25 डिसेंबरला बैठक बोलावली आहे. टीडीआर व एफएसआयसाठी जागामालकांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव तयार करून तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पथ विभागाचे कार्यकारी अभियंता अमर शिंदे यांनी सांगितले.

सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. डीपी रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर ही समस्या सुटण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे डीपी रस्ता वाहतुकीसाठी त्वरित खुला करण्यात यावा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.

-भरत कुंभारकर पाटील, उपशहर प्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)

हेही वाचा

Back to top button