Rise Up : असा रंगला महिला कबड्डी स्पर्धांचा थरार | पुढारी

Rise Up : असा रंगला महिला कबड्डी स्पर्धांचा थरार

पुणे : ’दै. पुढारी’ आयोजित राईझ अप महिलांच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा ही पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या सहकार्याने नेहरु स्टेडियमच्या मैदानावर पार पडली. या स्पर्धेमध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण येथून विक्रमी 99 संघांनी आपला सहभाग नोंदविला. किशोरी, कुमारी आणि महिलांच्या गटामध्ये या स्पर्धा खेळविण्यात आल्या. दै. ’पुढारी’च्या वतीने पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड भागातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि खेळाचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ’राईझ अप’ पुणे महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील वर्षी सुरू झालेल्या फक्त महिलांसाठीच्या राईझ अप या क्रीडा स्पर्धांच्या उपक्रमाच्या सिझन 2 ची सुरुवात या वर्षी सप्टेंबर महिन्यात बुद्धिबळ, कॅरम स्पर्धेने झाली होती. त्यानंतर महिलांच्या जिल्हास्तरीय कुस्ती आणि जलतरण स्पर्धाही उत्साहात पार पडल्या. महाराष्ट्रात अशा प्रकारची केवळ महिलांसाठीची स्पर्धा घेणारा दै. ’पुढारी’ हा एकमेव माध्यम समूह आहे. या राईझ अप सिझन 2 साठी माणिकचंद ऑक्सिरिच हे मुख्य प्रायोजक असून, सहप्रायोजक म्हणून रूपमंत्रा, मीडिया प्रायोजक म्हणून झी टॉकीज, एज्युकेशन पार्टनर म्हणून सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, बँकिंग पार्टनर म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप.  सोसायटी आणि सपोर्टिंग पार्टनर म्हणून पुणे महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

’दै. पुढारी’ च्या वतीने केवळ महिलांसाठी कबड्डीच्या स्पर्धा भरविण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षाप्रमाणेच दुसर्‍या वर्षीचेही नियोजन उत्तम करण्यात आलेले होते. एखाद्या स्पर्धेत केवळ महिलांचे 99 संघ सहभागी होणे ही सर्वात मोठी गोष्टी असून, ’दै. पुढारी’ चा हा उपक्रम स्तुत्य आहे. अशाच स्पर्धांमधून आगामी काळात इतर स्पर्धांमध्ये महिलांच्या स्पर्धांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.

– शांताराम जाधव (ज्येष्ठ कबड्डीपटू व ’अर्जुन’ पुरस्कार विजेते)

’दै. पुढारी’ च्या वतीने केवळ महिलांसाठी कबड्डीच्या स्पर्धा भरविण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी 44 संघांनी, तर या वर्षी विक्रमी 99 संघांनी संपूर्ण जिल्ह्यातून सहभाग घेतला. स्पर्धांचे नियोजनही उत्तम केले होते तसेच संघांकडून कोणतीही प्रवेश फी दै. ’पुढारी’ने घेतली नाही. ’दै. पुढारी’ ने महिला कबड्डीपटूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, आगामी काळातही अशाच स्पर्धा भरवाव्यात.

– संदीप पायगुडे (सहकार्यवाह, पुणे जिल्हा कबड्डी संघटना)

प्रशिक्षक व खेळाडू म्हणतात…

ग्रामीण भागातील मुलींनीही खेळात प्रावीण्य मिळवावे या हेतूने आर्मीमधील एका फौजीने खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. सध्या या संघाची जबाबदारी माझ्याकडे असून, त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. हे सर्व खेळाडू नवोदित असून, त्यांची ही पहिलीच स्पर्धा होती. त्यामुळे यश जरी मिळाले नसले तरी अनुभवाच्या जोरावर पुढील वर्षी नक्कीच प्रगतीचा आलेख उंचावेल.

– आविष्कार दिघे (प्रशिक्षक)

या स्पर्धेमध्ये सलग दुसर्‍यांदा आमचा
संघ सहभागी होत आहे. ’दै. पुढारी’ ने केवळ महिलांसाठी स्पर्धा आयोजित करून एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अशाच प्रकारच्या संधी ’दै. पुढारी’ च्या वतीने आगामी काळात उपलब्ध होतील, अशी
आशा आहे.

– वैष्णवी भाडाळे (कबड्डीपटू, लोणकर महाविद्यालय संघ)

’दै. पुढारी’ च्या वतीने सलग दुसर्‍या वर्षी या कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या असून, उत्तम नियोजन केले आहे. त्यामुळे आम्ही सहा संघ खेळवत आहोत. त्याचबरोबर स्पर्धेतील सहभागाबद्दल कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात आलेले नाही. आमच्या सहाही संघांतील खेळाडूंना एकाच व्यासपीठावर तीनही वयोगटांतील खेळाडूंचा खेळ पाहता आला हे या स्पर्धा आयोजनामागचे मोठे यश आहे.

– सागर खळदकर (प्रशिक्षक, डॉ. पतंगराव कदम महिला संघ)

’दै. पुढारी’ आयोजित या राईझ अप महिला कबड्डी स्पर्धेमध्ये आमचा संघ यावर्षी प्रथमच दाखल झाला आहे. संयोजकांच्या वतीने उत्तम आयोजन करण्यात आल्याने खेळाडूंचा उत्साह व्दिगुणित झाला आहे.

– अनंत हिरवे (प्रशिक्षक, तिरंगा स्पोर्ट्स क्लब)

’दै. पुढारी’ आयोजित या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन खेळण्याचा आनंद अधिक मिळाला. ’दै. पुढारी’ च्या वतीने स्पर्धांचे आयोजन उत्तम करण्यात आले होते. त्याचा फायदा आम्हाला खेळाडूंच्या विविध चालींचा अभ्यास करण्यावर भर देता आला.

– साक्षी रेणुसे (कबड्डीपटू, तिरंगा स्पोर्ट्स क्लब)

 

’दै. पुढारी’ च्या वतीने महिलांसाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. सलग दुसर्‍या वर्षी आम्ही या स्पर्धांमध्ये सहभाग होत असून, उत्तम नियोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारचे प्रोत्साहन खेळाडूंना ’दै. पुढारी’कडून मिळत राहायला हवे.

– सानिका खाडे (कबड्डी, डॉ. पतंगराव कदम महिला संघ)

हेही वाचा

Back to top button