

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : मंचर (ता. आंबेगाव) येथे सन 2018 मधील गणपती उत्सव काळात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ करीत धक्काबुक्की करणार्या आरोपीला राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए. घणीवाले यांनी 7 दिवसांचा सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. स्वप्नील प्रकाश महाले (वय 28, रा. मंचर) असे आरोपीचे नाव आहे. गणेशोत्सवात 22 सप्टेंबर 2018 रोजी मंचर चौकात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलिस कर्मचारी ईश्वर शिरसाट हे कर्तव्य बजावत होते.
त्या वेळी 7 -8 तरुण एकमेकांना शिवीगाळ करीत होते. शिरसाट यांनी संबंधित तरुणांना 'बाजूस सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे, गोंधळ करू नका,' असे सांगितले. त्यावर आरोपी महालेने शिरसाट यांच्या शर्टची कॉलर धरून धक्काबुक्की केली. यावरून मंचर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून आरोपीवर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस. एस. पांचाळ यांनी केला.
हा खटला राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. घणीवाले यांच्या समोर सुरू होता. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता व्ही. एन. देशपांडे व ए. एस. ब—म्हे यांनी तीन साक्षीदार तपासले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी न्यायाधीश घणीवाले यांनी आरोपी स्वप्नील महाले यास 7 दिवसांचा सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. कोर्टातील कामकाज महिला पोलिस कॉन्स्टेबल एस. आर. बटवाल यांनी पाहिले.
हेही वाचा :