खंडेराय-म्हाळसादेवीला तेलवण व हळद | पुढारी

खंडेराय-म्हाळसादेवीला तेलवण व हळद

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या श्रीखंडोबा देवाचा चंपाषष्ठी उत्सव धार्मिक वातावरणात जेजुरी गडावर सुरू आहे. मार्गशीर्ष पंचमीला पारंपरिक पध्दतीने सायंकाळी गडावरून तेलहंडा काढून मानकरी व भाविकांनी अर्पण केलेल्या तेलाने श्रीखंडोबा व म्हाळसादेवीला तेलवण करून हळद लावण्यात आली. मार्गशीर्ष प्रतिपदेला जेजुरी गडावर देवाची घटस्थापना होऊन देवाच्या उपासनेला सुरुवात झाली आहे. मार्गशीर्ष पंचमीला देवाला तेलवण व हळद लावली जाते, त्या निमित्ताने रविवारी (दि. 17) सायंकाळी जेजुरी गडावरून गुरव, कोळी, वीर, घडशी या पुजारी सेवकवर्गाच्या वतीने तेलहंडा काढण्यात आला. मंदिरासमोर या तेलहंड्याचे पूजन करून आरती करण्यात आली. कोळी समाजाच्या मानकरी बांधवानी तेलहंडा डोक्यावर घेऊन घडशी समाजाच्या वतीने सनई-चौघडा वाजवीत मिरवणूक काढण्यात आली.

या वेळी पुजारी, सेवकवर्गाचे गणेश आगलावे, प्रशांत सातभाई, नीलेश लांघी, संतोष लांघी, मिलिंद सातभाई, अनिल बारभाई, मुन्ना बारभाई, संजय आगलावे, अविनाश सातभाई, दादा मोरे, सतीश कदम, सागर मोरे, अरुण मोरे, प्रवीण मोरे, घनश्याम मोरे, भालदार नंदू मोरे यांच्यासह देवसंस्थानचे अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. जेजुरी गडावरून वाजत-गाजत तेलहंडा गावच्या चावडीत आणण्यात आला. श्रीखंडोबा देवाचे बारा बलुतेदार व अठरा आलितेदर मानकरी आहेत. या सर्व मानकरी समाजाला देवाच्या लग्नाच्या हळदीसाठी काढण्यात येणार्‍या तेलहंड्यात तेल घालण्याचा मान आहे. त्यांचे चावडीत नाव पुकारून हंड्यात तेल अर्पण करण्यात आले. त्यानंतर तेलहंडा गडावर नेण्यात आला. शेजारतीला मानकरी व भाविकांनी अर्पण केलेल्या तेलाने देवाला अंघोळ घातली. त्यानंतर श्रीखंडोबा व म्हाळसादेवीला हळद लावण्यात आली. जेजुरी गडावर चंपाषष्ठीला हळद व पौष पौर्णिमेला पाल येथे देवाचे लग्न होते.

हेही वाचा :

Back to top button