शिक्षा झालेल्या एकाही व्यक्तीला भाजपमध्ये प्रवेश दिलेला नाही : अजयकुमार मिश्रा | पुढारी

शिक्षा झालेल्या एकाही व्यक्तीला भाजपमध्ये प्रवेश दिलेला नाही : अजयकुमार मिश्रा

सावंतवाडी, पुढारी वृत्तसेवा : ज्यांना शिक्षा झाली आहे अशा कुठल्याही व्यक्तीला आम्ही भाजपमध्ये प्रवेश दिलेला नाही आणि देणारही नाही. खा. राहुल गांधी आणि लालूप्रसाद यादव यांना शिक्षा झाली, त्यांना आम्ही कुठे भाजपमध्ये घेतले? असा प्रतिप्रश्न करत त्यांनी अशा शिक्षा झालेल्यांना भाजपमध्ये आम्ही घेणार नाही. भाजपच्या एकही आमदार, खासदारावर दोषारोप नाहीत, असा दावा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत केला.

काँग्रेस सरकारच्या काळातच ईडीचा गैरवापर झाल्याचा दावा करत त्यांनी ईडी आपल्या अधिकारात काम करीत आहे, जे दोषी असतील त्यांना चौकशीला सामोरे जावेच लागेल, असे ते म्हणाले.

सावंतवाडी येथे भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. माजी आ. राजन तेली, प्रमोद जठार, प्रथमेश तेली, प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई, श्वेता कोरगावकर, आनंद नेवगी, अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, सचिन साठेलकर, विनोद सावंत, परीक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते.

ना. मिश्रा म्हणाले, ईडी ही स्वायत्त संस्था आहे तर भाजप हा राजकीय पक्ष आहे. भाजप ‘ईडी’ चालवत नाही.याबाबत विरोधक केवळ खोटा प्रचार करत आहेत. भाजपमध्ये प्रवेश केला की ‘ईडी’च्या चौकशी बंद होतात, हे विरोधकांच्या गैरसमज असून ज्यांच्या चौकशी सुरू आहेत. त्यांनी कुठल्याही पक्षात प्रवेश केला तरी चौकशी सुरूच राहणार असल्याचे ना. मिश्रा यांनी सांगितले.

ईडी चौकशीच्या फेर्‍यात असलेल्या अनेकांनी भाजपात प्रवेश केल्याकडे त्यांना छेडले असता, ज्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांच्यावर अद्याप आरोप सिद्ध झालेले नाहीत. त्यांंच्यावर आरोप सिद्ध होतील तेव्हा त्यांना भाजपचे दरवाजे बंद होतील, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या साडेनऊ वर्षांत देशात अनेक विकासात्मक उपक्रम राबवले आहेत. जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी ‘विकास संकल्प यात्रा’ आम्ही गावागावात पोहोचवणार आहोत. या माध्यमातून जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचत आहेत की नाहीत याची आम्ही खात्री करून घेत आहोत,असे त्यांनी स्पष्ट केले.

‘कौन राहुल गांधी’?

काँग्रेसचे खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेबाबत विचारलेला प्रश्नाला उत्तर देताना ‘कौन राहुल गांधी’ असा सवाल ना.अजय कुमार मिश्रा यांनी केला. भारत जोडत जोडत काँग्रेस सध्या कुठे पोहोचली आहे, हे आपल्याला माहिती आहे, अशी उपासाहात्मक टीका त्यांनी केली. अलिकडेच निवडणुका झालेल्या पाच राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये भाजपाला निर्विवाद यश मिळाले तर अन्य दोन राज्यांमध्ये भाजपाचा मतदार वाढला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘ हे इंडिया गटबंधन नव्हे तर ईडी गटबंधन’आहे अशी टीका ना. मिश्रा यांनी केली.

2024 ला जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच साथ देईल

विकसित भारत संकल्प यात्रा ही 15 नोव्हेंबर ते 26 जानेवारीपर्यंत देशभरात विविध राज्यात तळागाळापर्यंत पोहोचणार आहे. लोकांच्या समस्या तसेच केंद्र शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या काय, याचा आढावा घेण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याापासून भारत देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांनी जगातील अनेक देशांबरोबर चांगले संबंध जुळवले आहेत. त्यांच्या शा यशामुळे विरोधकांना पोटशूळ उठत असून पंतप्रधानांना बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. मात्र जनता याला बळी पडणार नाही तर येणार्‍या सन 2024 च्या निवडणुकीतही जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साथ देईल, असा विश्वास ना. मिश्रा यांनी व्यक्त केला.

Back to top button