दर घसरल्याने दुग्ध व्यवसायाला घरघर ; दूध उत्पादक शेतकरी अडचणीत

दर घसरल्याने दुग्ध व्यवसायाला घरघर ; दूध उत्पादक शेतकरी अडचणीत

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या तीन आठवड्यांपासून दुधाचे दर कमी झाल्याने शेतकर्‍यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. शेतीला पूरक म्हणून अनेक तरुण या व्यवसायाकडे वळले खरे मात्र घसरलेल्या दरामुळे दूध धंदा आतबट्ट्याचा खेळ बनला आहे. 35 रुपये लिटरने विक्री होणारे दूध सध्या 23 ते 27 रुपयांपर्यंत खाली आल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करणार्‍या दुग्ध व्यवसायाला घरघर लागली आहे. बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो. अनेक तरुण या व्यवसायाकडे वळले आहेत. मात्र, चालू वर्षी कमी झालेला पावसाळा, चार्‍याची कमतरता, पशुखाद्यांचे वाढलेले दर, दुधाचे घसरलेले दर यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे.

संबंधित बातम्या :

गेल्या महिन्यात तरडोली व कोर्‍हाळे येथील दूध व्यवसायिकांनी दुधाचे दर वाढावे यासाठी आंदोलन केले. मात्र, सरकारकडून याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकर्‍यांची अवहेलना सुरू असल्याचे चित्र आहे. दुधाचे दर वाढवण्यासाठी मागणी करूनही सरकारचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

सध्या हॉटेलमध्ये विकत मिळणार्‍या बाटलीबंद पाण्यापेक्षा शेतकर्‍यांकडून खरेदी केले जाणारे दूध स्वस्त आहे. हॉटेलमध्ये बाटलीतील पाण्याचा दर प्रतीलिटर किमान 30 रुपये, तर शेतकर्‍यांकडून खरेदी केल्या जाणार्‍या प्रतीलिटर दुधाचा दर 25 रुपयांहून कमी आहे.
बेरोजगारीवर मात करीत अनेक तरुणांनी हा व्यवसाय उभा केला. प्रसंगी कर्ज काढले, प्रक्रिया उद्योग उभारले. मात्र, दुधाला दर नसल्याने तरुण हतबल झाल्याचे चित्र आहे. राज्य सरकारने फक्त दुधाचे भाव जाहीर करण्याचे नाटक केले, प्रत्यक्षात मात्र निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकार कोणतीही मदत करायला तयार नाही, असा आरोप दूध उत्पादक शेतकरी करत आहेत.

दुष्काळाचे सर्वाधिक चटके दूध व्यवसायाला बसत आहेत. दुभत्या गाई-म्हशींसाठी चारा उपलब्ध नाही. सध्या कारखान्यांचा हंगाम सुरू असल्याने फक्त उसाच्या वाढ्यावरच जनावरांच्या चार्‍याची भीस्त आहे. पशुखाद्य, सुग्रास आणि पोषणमूल्य आहारातही पूर्वीच्या तुलनेत सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दुधाचे दर परवडत नाहीत. दूध व्यवसायातून चारा आणि पशुखाद्याचे पैसेही निघत नाहीत. मका व कडवळ पुरेशा प्रमाणात मिळत नाही. गायींच्या किमतीही लाखोंच्या घरात आहे. दुधाला कमीत कमी 40 रुपये प्रतिलिटर दर मिळावा.
                                      – महेश भोसले, दूध उत्पादक शेतकरी, वाणेवाडी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news