सावधान ! पारव्यांमुळे गभीर आजारांचा धोका | पुढारी

सावधान ! पारव्यांमुळे गभीर आजारांचा धोका

पिंपळे गुरव : नवी सांगवी येथील बस स्टॉपसमोरील खुल्या मैदानात काही नागरिक सकाळच्या वेळी पारवे- कबुतरे यांना धान्य खायला घालत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा पारव्यांमुळे घातक आजारांना आमंत्रण दिले जात असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने पारव्यांना उघड्यावर खाद्य पदार्थ टाकल्यास पाचशे रुपयांचा दंड आकारण्याचा नियम केला आहे. परंतु, पुण्यातल्या उपनगरांत उघड्यावर खाद्य पदार्थ टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचा नियम कधी केला जाईल, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.

हायपर सेन्सेटिव्ह, न्यूमोनिया, दमा असे फुफ्फुसांशी संबंधित आजार होण्यास हे पारवे कारणीभूत ठरत आहेत. रुग्णांचे फुफ्फुस आकुंचन पावणं, बोलताना दम लागणं अशा तक्रारींमध्ये वाढ झाल्याचं आणि कित्येकदा तर नागरिकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जाते. मोकळ्या मैदानातील जागेच्या आजूबाजूला नागरी वसाहत, सोसायट्या असल्याने अनेकदा तर हे पारवे घरातही प्रवेश करतात.

या पारव्यांची पिसं आणि विष्ठेमधून अनेक आजार बळावत असल्याचे समोर आले असल्याने येथील नागरिकांनी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पक्षांना खायला टाकू नये, याबद्दल आधीच ठिकठिकाणी सूचना केलेल्या आहेत. अनेक ठिकाणी तसे बोर्डही लावलेले आहेत. परंतु, खाद्यपदार्थ टाकणार्‍यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा

Back to top button