फ्लेक्स लावताय? तर अशी घ्यावी परवानगी | पुढारी

फ्लेक्स लावताय? तर अशी घ्यावी परवानगी

वडगाव मावळ : घोषणा फलक फ्लेक्स होर्डिंग्स यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेला निकाल व महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार वडगाव नगरपंचायत प्रशासनाने कार्यवाही सुरू केली असून आता यापुढे फ्लेक्स किंवा होर्डिंग लावण्यासाठी नगरपंचायतची परवानगी घ्यावी लागणार आहे. अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली आहे.

अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक होर्डिंग पोस्टरबाबत उच्च न्यायालयाने सन 2017 मध्ये सविस्तर निकाल दिला होता, त्यानुसार महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासनाने सन 2022 मध्ये परिपत्रक काढून नियमावली ठरवून दिलेली आहे. परंतु, या नियमावलीची अंमलबजावणी होत नसल्याने शहरांमध्ये कुठेही कसेही फ्लेक्स लावले जात होते. तसेच यावर कुठलेही नियंत्रण नसल्याने मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी फ्लेक्सची गर्दी होऊ लागली होती.

फौजदारी कारवाई केली जाणार

दरम्यान, वडगाव नगरपंचायत प्रशासनाने आता फ्लेक्स होर्डिंग संदर्भात उच्च न्यायालयाचा निकाल व महाराष्ट्र शासनाने दिलेले निर्देश यानुसार कडक कार्यवाही सुरू केली असल्याचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील ठिकठिकाणी लावण्यात आलेले सर्व फ्लेक्स होर्डिंग काढून टाकण्यात आले आहेत. तसेच, यापुढे फ्लेक्स लावण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक असून त्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी म्हणून सोमनाथ आगळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांनी फ्लेक्स लावण्याआधी नगरपंचायतकडे लेखी अर्ज करून ठरवून दिल्याप्रमाणे फी भरणे आवश्यक आहे. त्यानंतरच फ्लेक्स लावावा अन्यथा परवानगी न घेता फ्लेक्स लावल्यास तो फ्लेक्स नगरपंचायत प्रशासनाकडून त्याच दिवशी काढून टाकला जाईल व दंडात्मक तसेच फौजदारी कारवाईही केली जाणार आहे.

असा असणार आहे दर

नगरपंचायत प्रशासनाने ठरवून दिलेल्या सार्वजनिक जागेत फ्लेक्स लावण्यासाठी 100 रुपये स्केयर फूटच्या फ्लेक्सला एक ते तीन दिवसांसाठी शंभर रुपये, चार ते सात दिवसांसाठी 200 रुपये सात ते दहा दिवसांसाठी व पुढील दिवसांसाठी 500 रुपये फी करण्यात येणार आहे. तसेच 100 रुपये स्केअर फूट पुढील आकारासाठी प्रति स्केअर फूट 5 रुपये प्रमाणे फी करण्यात येणार आहे. तसेच खासगी जागेत फ्लेक्स लावणार असेल तरीही संबंधित जागामालकाची संमती व रीतसर फी भरावी लागणार आहे.

 होर्डिंग्जवर लागणार 15 टक्के कर

काही नागरिक त्यांच्या खासगी जागेत होर्डिंग्ज उभारून ते भाडे तत्त्वावर देतात. आशा होर्डिंग्जलाही आता कर आकारला जाणार आहे. होर्डिंग्ज मालक व भाड्याने घेणारा यांच्यात झालेल्या करारातील रकमेच्या 15 टक्के कर हा नगरपंचायतला द्यावा
लागणार आहे.

हेही वाचा

Back to top button